सचिन सांगळे नांदूरशिंगोटेसिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी व अनेक व्हॉल्व्हमधून पाण्याची राजरोसपणे चोरी होत आहे. एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा समिती गेल्या काही दिवसांपासून बरखास्त असल्याने दिवसेंदिवस पाणी चोरांचे फावते आहे.पिण्याच्या पाण्याची चोरी व गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली व्हॉल्व्हद्वारे होणाऱ्या पाण्याच्या गळतीचे पाणी खुलेआम शेतीसाठी वापरले जात असल्याचे चित्र आहे. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असताना उपलब्ध पाण्यातच आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा योजना संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.भोजापूर धरणात फक्त २३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुख्य जलवाहिनी व व्हॉल्व्हद्वारे नेहमीच पाणीचोरीचे प्रकार घडत असतात. भोजापूर धरण ते मऱ्हळ खुर्द आदि २२ किलोमीटर अंतरापर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी रामवाडी (चास) येथील व्हॉल्व्हला थेट पाइनलाइन करून पाणी डाळींब बागेसाठी नेल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यास पाणी नाही तर दुसरीकडे दिवसा-ढवळ्या पाणीचोरी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आहे. यामुळे योजनेवरील वीजबिल मोठ्या प्रमाणात येत असून, त्याचा फटका पाच गावांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासन पाणी गळती रोखण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने पाणी बचत कशी होणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असून, हजारो नागरिकांची तहान भागवत आहे.
पाणी चोरीकडे डोळेझाक
By admin | Updated: March 16, 2016 21:56 IST