येवला तालुक्यात पाणीटंचाई; नऊ गावे, तीन वाड्यांना टँकरद्वारे मदत
By Admin | Updated: May 12, 2014 19:08 IST2014-05-12T18:59:29+5:302014-05-12T19:08:10+5:30
येवला : तालुक्यात नऊ गावे व तीन वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात मागणी येईल तशी पाहणी करून तत्काळ पाणीपुरवठा करणार असल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांनी सांगितले.

येवला तालुक्यात पाणीटंचाई; नऊ गावे, तीन वाड्यांना टँकरद्वारे मदत
येवला : तालुक्यात नऊ गावे व तीन वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आगामी काळात मागणी येईल तशी पाहणी करून तत्काळ पाणीपुरवठा करणार असल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांनी सांगितले.
सध्या महालगाव, मुरमी, अहेरवाडी, देवरगाव, तळवाडे, बाळापूर, कासारखेडे, निळखेडे, गुजरखेडे या नऊ गावांना येवला पंचायत समितीने लावलेल्या चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय घनमाळी मळा (नगरसूल), शिवाजीनगर (तळवाडे), महादेववाडी (सायगाव) या तीन वाड्यांना पाणीपुरवठा करावा लागत आहे.
मध्यंतरीच्या पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी झाली. त्यामुळे प्रशासनालाही इतर कामांमध्ये लक्ष घालण्यात उसंत मिळाली आहे.
पांजरवाडी, चांदगाव, जायदरे, लहीत या चार गावांच्या टँकर मागणीचे प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. याशिवाय तीन वाड्यांची पाणी टँकरसाठी मागणी आली आहे.
तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्या संयुक्त पाहणीनंतर वाड्यांवरील पाणीटंचाईचे स्वरूप व उपलब्ध स्त्रोत लक्षात घेऊन सदर वाड्यांबाबत टँकर पुरविण्याचे निर्णय होणार आहे. (वार्ताहर)