येवल्यात पाणीटंचाई
By Admin | Updated: May 9, 2017 01:38 IST2017-05-09T01:38:16+5:302017-05-09T01:38:28+5:30
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटले आहे.

येवल्यात पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यात पाणीटंचाईची व्याप्ती वाढू लागली असून, स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची तीव्रता वाढायला लागली आहे.
तालुक्यातील बाळापूर, कुसुमाडी, चांदगाव, ममदापूर, खैरगव्हाण, जायदरे, अहेरवाडी, देवळाणे, दुगलगाव, बोकटे, धामणगाव, कोळगाव, वाईबोथी, बदापूर, खरवंडी, देवठाण व सायगाव येथील महादेववाडी, खैरगव्हाण (गोपाळवाडी) अशी १६ गावे व तीन वाड्यांसाठी पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे आला आहे. स्थळ पाहणी होऊन या गावांना खासगी सात व सरकारी दोन अशा एकूण नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. येवला शहरातील नांदूर विहिरीवरून तालुक्याला पाणीपुरवठा होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा अधिक ४८२ मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली, तरी तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच आहे. येवला तालुक्याला लागलेले पाणीटंचाई आणि टँकरचे ग्रहण कधी सुटणार, असा जाब राजकीय नेत्यांना आता जनता विचारू लागली आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईने हैराण झालेल्या महिलांची वणवण भटकंती सुरू आहे. प्रशासनाने ज्या भागात टँकर नाही तेथे टँकर त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी होते आहे.