सप्तशृंगगडावर पाणीटंचाई

By Admin | Updated: February 9, 2017 22:56 IST2017-02-09T22:56:13+5:302017-02-09T22:56:32+5:30

चिंता चैत्रोत्सवाची : भवानी पाझर तलावाने गाठला तळ

Water shortage on Saptshringgad | सप्तशृंगगडावर पाणीटंचाई

सप्तशृंगगडावर पाणीटंचाई


सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाने तळ गाठला असून, फेब्रुवारी महिन्यापासूनच सप्तशृंगगडवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. आता तर भवानी पाझर तलावाने अक्षरश: तळ गाठला आहे. सध्या सप्तशृंगगडावर दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
गतवर्षी मुसळधार पावसामुळे सप्तशृंगगडाला पाणीपुरवठा करणारा भवानी पाझर तलाव भरल्यामुळे किमान ८ ते ९ महिन्यांचा गडावरील पाणीप्रश्न सुटणार या आशेने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु या पाझर तणावाला मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन आता अक्षरश: तळ गाठला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चैत्रोत्सव यात्रा सुरू होत असून, लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
ही बाब ओळखून सप्तशृंगगडचे उपसरपंच गिरीश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य जगन बर्डे, राजेश गवळी, गणेश बर्डे व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सहकार राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन याच्याकडे वारंवार पाझर तलाव दुरुस्तीसाठी निवेदन देऊन निधीची मागणी केली. परंतु आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. बी. धूम, शाखा अभियंता के. एस. सोनवणे, पी. आर. गुंजाळ यांनीही तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली; मात्र ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी अवस्था या भवानी पाझर तलावाची झाली आहे. यात्रा कालावधीत पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचा विचार केला जातो; एकदा यात्रा झाली की परत इकडे कुणी ढुंकूनही बघत नाही.
आता चैत्रोत्सव यात्रा तोंडावर आली असून, लाखो भाविक गडावर येणार असल्याने टॅँकरने पाणी पुरेसे मिळणार का? मे महिन्याच्या सुट्यांत दररोज हजारो भाविक दर्शनाला येतात. त्यांना अक्षरश: पाच रुपये प्रतिग्लासप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. भाविकांची आणि ग्रामस्थांची पाण्यासाठीची होणारी हेळसांड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Water shortage on Saptshringgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.