येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाईची झळ

By Admin | Updated: April 3, 2017 00:44 IST2017-04-03T00:43:41+5:302017-04-03T00:44:01+5:30

येवला : तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे

Water shortage crisis started in Yeola | येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाईची झळ

येवल्यात जाणवू लागली पाणीटंचाईची झळ

येवला : तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. तालुक्यातील बाळापूर, कुसमाडी, चांदगाव, ममदापूर व सायगाव येथील महादेववाडी अशी चार गावे व एका वाडीला पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे आला आहे. या गावांपैकी बाळापूर, कुसमाडी व चांदगाव या गावांची स्थळ पाहणी झाली असून, टँकर मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ममदापूर व सायगाव येथील महादेववाडीची पाहणी बाकी असून, सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ राजापूर, सोमठाणे येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा अधिक ४८२ मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली, तरी तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज आहे. दरम्यान, पालखेडचे पाणी आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसले, तरी अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. राजापूर पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या पाण्याचा उपसा झाल्यानंतर केवळ दोन फूट पाणी येत आहे. आगामी आठ दिवसांत येथेही पाणीटंचाईची चिन्हे आहेत. सोमठाणे येथील विहिरीचा स्रोतदेखील आटला आहे.
येवला तालुक्याला लागलेले पाणीटंचाई आणि टँकरचे ग्रहण कधी सुटणार, असा सवाल केवळ अर्थपूर्ण राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांना आता जनता विचारू लागली आहे.
गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या तीन महिन्यात कुसमाडी, वाईबोथी या
दोन गावांसह तालुक्याच्या पूर्व भागातील चार वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती ओढवली
होती. यंदा सरासरीएवढे पर्जन्यमान झाल्याने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यांच्या पहिल्या टप्प्यात एकाही गावाला पाणीटंचाई भासली नाही.
तालुक्यातील काही भागांतील विहिरींची सफाई करून त्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरता येईल. सरासरीएवढे पर्जन्य होऊनदेखील पाण्याचे संकट ‘कमतरता आणि अशुद्धता’ असे दुहेरी बाजूने भेडसावत आहे. नियोजनशून्य आणि अनियंत्रित वापरामुळे उपलब्ध पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. पुढच्या पिढीला जलसमस्येमुळे हतबल होण्याची वेळ येऊ नये म्हणून वर्तमानकाळात प्रभावी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. पाणीसंकटाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे.
या दृष्टीने वर्षभरातील विशेष दिवस आणि सप्ताह कृतीयुक्त साजरे व्हावेत. जागतिक जल दिन, प्राणिकल्याण पंधरवडा, पृथ्वी दिन, जागतिक आरोग्य दिन, जागतिक पर्यावरण दिन, परिसर स्वच्छता दिन, कृषी दिन, वन महोत्सव सप्ताह, जागतिक आझोन दिन, जागतिक स्वच्छता अभियान, वन्यजीव
सप्ताह, नैसर्गिक आपत्ती निवारण
दिन, जागतिक अन्न दिन, राष्ट्रीय पर्यावरण जागृती अभियान, जागतिक जैवविविधता संवर्धन दिन आदि सप्ताह साजरे करून जनजागृती घडविणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी समस्या लोकचळवळ बनेल.
पाणीप्रश्नाबाबत जनता व शासन उदासीन असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याअगोदर पाण्याचे कालबद्ध नियोजन करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. (वार्ताहर)

Web Title: Water shortage crisis started in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.