पाण्याचे आवर्तन रोखले

By Admin | Updated: November 24, 2015 21:51 IST2015-11-24T21:50:15+5:302015-11-24T21:51:11+5:30

सटाणा : मुंगसे, पिंगळवाडेतील ग्रामस्थांनी केले दरवाजे बंद

Water rotation stopped | पाण्याचे आवर्तन रोखले

पाण्याचे आवर्तन रोखले

सटाणा : गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या बागलाण तालुक्यातील करंजाडी खोऱ्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाखोड लघुप्रकल्पामधून पिण्यासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोमवारी रात्री सोडले; मात्र मंगळवारी पहाटे मुंगसे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी दरवाजे बंद करून पाण्याचे आवर्तन रोखल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी पाणी सोडण्याचे चाक पळवून नेल्याने तणाव निर्माण झाला असून, मुंगसे, पिंगळवाडे विरुद्ध सात गावे असा तीव्र संघर्ष पेटला आहे. सात गावांच्या सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या जमावाने मंगळवारी दुपारी जायखेडा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत आवर्तन रोखणाऱ्यांना अटक करा, अशी ठाम भूमिका घेत आठ तास ठिय्या दिल्याने जाखोडचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाण्यासाठी संपूर्ण खोरे टाहो फोडत असताना, या दरम्यानच मुंगसे व पिंगळवाडे ग्रामस्थांनी पाण्याचे आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्याची मागणी करून या आवर्तनाला तीव्र विरोध केला होता. परंतु टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाखोड लघुप्रकल्पामधून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जलसंपदा विभागाने प्रकल्पाचा दरवाजा खोलून पाण्याचे आवर्तन सोडले; मात्र मंगळवारी पहाटे काही ग्रामस्थांनी प्रकल्पाचा दरवाजा बंद करून आवर्तन रोखत चाक पळवून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. आवर्तनाचे पाणी करंजाडपर्यंत पोहचले होते. मात्र अचानक पाणी बंद झाल्याने करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या जमावाने काल दुपारी उपाशीपोटी जायखेडा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करून आवर्तन रोखणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी सकाळी दहा वाजेपासून पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिला. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. अखेर दुपारी साडेचार वाजता सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी अज्ञात तीस ते चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अशोक काकुळते, निकम यांनी सायंकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा यावेळी निर्णय घेतला. आंदोलनात संजय देवरे, राहुल पाटील, वसंत पवार, दिलीप शेवाळे, राकेश देवरे, बापू देवरे, बळीराम जाधव यांच्यासह चारशे ते पाचशे ग्रामस्थ सहभागी झाले होते़ (वार्ताहर)

Web Title: Water rotation stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.