चणकापूरमधून उजव्या कालव्याला पाणी
By Admin | Updated: February 6, 2016 22:19 IST2016-02-06T22:16:35+5:302016-02-06T22:19:16+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : पुढील आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन

चणकापूरमधून उजव्या कालव्याला पाणी
कळवण : चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत तसेच या कालव्याद्वारे भेंडी पाझर तलाव भरून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळवण व देवळा तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले.
सध्या भेंडीगाव दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीप्रश्नासंदर्भात कळवण येथे भेंडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेत याबाबत तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून भेंडी व परिसरातील पाणीप्रश्नाकडे यंत्रणेचे लक्ष वेधले.
दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन चालू असून, पाटबंधारे विभागाने याबाबत अहवाल दिला आहे. भविष्यातील पाणी मागणीचा विचार करून नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चणकापूर उजवा कालव्यात पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरणे व पाणीप्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत लाभक्षेत्रातील कळवण, देवळा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
यावेळी दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान चणकापूर धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती प्रवीण रौंदळ, विलास रौंदळ यांनी दिली.
चणकापूर उजवा कालव्याला पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व सदस्य नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत गुरुवारी पुन्हा या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी केली.
शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, वसंत मोरे, प्रभाकर सोनवणे, बापू रौंदळ, भाऊसाहेब रौंदळ, तुषार रौंदळ, निवृत्ती रौंदळ, यशवंत देवरे, बापू देवरे, अमोल देवरे, शैलेश देवरे, संजय गायकवाड, दिनेश मोरे आदिंसह भेंडी, निवाणे, वाजगाव येथील शेतकऱ्यांचा सहभाग होता.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतीसाठी आवर्तन
सोडून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे यांनी केली आहे.