पोलीस बंदोबस्तात पाण्याचे आरक्षण
By Admin | Updated: November 21, 2015 23:19 IST2015-11-21T23:18:47+5:302015-11-21T23:19:30+5:30
फरांदे-कदम यांच्यात जुंपली : दिलासा नाहीच, काटकसर करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पोलीस बंदोबस्तात पाण्याचे आरक्षण
नाशिक : पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी सभागृहाला घातलेला घेराव, प्रचंड पोलीस बंदोबस्त व पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलनात सेना-भाजपात झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने जिल्हाधिकारी कार्र्यालयात तब्बल अडीच तास गरमागरम चर्चेने धरणाच्या पाणी आरक्षणाची बैठक गाजली.
परंतु धरणातील उपलब्ध साठा व त्यापेक्षा असलेली अधिक मागणी पाहता, आता हाती असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्यापलीकडे पर्यायच नसल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भविष्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी मुंबईत बैठक घेण्याचे जाहीर केले.
नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर पेटलेल्या पाणी वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर दुपारी तीन वाजता पाणी आरक्षणाची बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने या बैठकीसाठी जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी सकाळी अकरा वाजेपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पालकमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी व कॉँग्रेसने एकत्रित आंदोलन छेडले तर सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पालकमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडली. अशा परिस्थितीत दुपारी तीन वाजेची बैठक सायंकाळी साडेपाच वाजता नियोजन भवनात सुरू करण्यात आली, त्यावेळी पाण्याच्या प्रश्नावर आत्ताच तोडगा काढा म्हणून अडून बसलेल्या शेतकऱ्यांनी नियोजन भवनाबाहेरच ठाण मांडल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्तात बैठक सुरू करण्यात आली.
पाण्याच्या प्रश्नावरून गेल्या महिन्यात भाजपा वगळता सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केल्याचा धागा पकडत, आमदार देवयानी फरांदे वादाला तोंड फोडले. पाण्याच्या प्रश्नाला भाजपाच जबाबदार असल्याचा प्रचार केला जात असून, त्यातून शहरातील लोकप्रतिनिधींना बदनाम केले जात असल्याचे सांगितले. पाण्याच्या प्रश्नावर मराठवाड्यातील नेते पंकजा मुंडे व अशोक चव्हाण एकत्र येत असताना नाशिक जिल्ह्यात फक्त छगन भुजबळ व अनिल कदम यांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात आंदोलन केल्याची बाब त्यांनी बोलून दाखविली, त्यावर आमदार अनिल कदम यांनी आक्षेप घेतला. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण आणू नये, आम्हाला राज्याचे नेतृत्व अजिबात करायचे नाही, भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले तर मलाही मतदारांनी दोन वेळा निवडून पाठविल्यामुळे त्यांच्यासाठी लढा देणे गरजेचे असल्याचे सांगितले. आमदार फरांदे व कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने सभागृहाचे वातावरण तप्त झाले. त्यात आमदार सीमा हिरे यांनी ज्या वेळी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा लोकप्रतिनिधींची बैठक का बोलविली नाही, असा पालकमंत्री गिरीश महाजन यांना घरचा आहेर दिला व पाणी तर गेले, पुढे काय करणार असा सवाल केला. या वादात सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करीत पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग न देण्याचे आवाहन केले, तर पालकमंत्री महाजन यांनी आमदार निर्मला गावित यांना बोलू देण्यास रोखले. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत अखेर पालकमंत्री महाजन यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत, जे झाले ते विसरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी काय करता येईल याचा विचार करावा असे आवाहन केले. धरणांमध्ये असलेल्या पाण्याच्या साठ्यातूनच काटकसर करून वाचलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांच्या बागा वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच जिल्ह्यातील अपूर्ण धरणे व प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सोमवारी मुंबईत पाटबंधारे खात्याचे अधिकारी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. प्रसंगी कर्ज काढून अपूर्ण प्रकल्प पूर्ण करू व जिल्ह्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवू असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी धरणांतील उपलब्ध साठा व त्यावर पिण्याच्या पाण्याची मागणी अशी आकडेवारी सादर करून साधारणत: उपलब्ध पाण्यापेक्षा दहा टक्के पाणीसाठा जिल्ह्यात मागणीपेक्षा कमी असल्याचे सांगितले व पाणी आरक्षणात शेतीसाठी पाणी सोडणे शक्य नसल्याची माहिती दिली.
नद्या व धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैधपणे पाणी उपसा सुरू असल्याने उद्यापासून अशा प्रकारे पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इरादा जिल्हा प्रशासनाने व्यक्त करताच, आमदार देवयानी फरांदे यांनी कारवाई करायची असेल तर जायकवाडी धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर अगोदर करा व नंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करा असा इशारा दिला. आमदार अनिल कदम यांनी प्रवरा परिसरात ३० हजार वीज पंपाद्वारे पाणी उपसा सुरू असल्याचे सांगितले. गंगापूर डाव्या कालव्यावरील १९ गावांच्या फळबागांसाठी पाणी मिळावे अशी मागणी केली. या बैठकीत खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार दीपिका चव्हाण, आमदार आसिफ शेख यांनीही आपले मते मांडली.
पाणी चोरांवर कठोर कारवाई : महाजन
जिल्ह्यातील धरणांच्या पाणीप्रश्नावर शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या तीव्र भावना पाहता, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात मराठवाड्यात होणाऱ्या बेकायदा पाणी उपसाविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पाण्याचा प्रश्न गंभीर असून, त्याचा काटकसरीने वापर करायला हवा, एकीकडे शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यात कपात करायची व दुसरीकडे त्याचा वारेमाप उपसा सुरू असेल तर कोणाचीही दयामया न करता, बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.