राहुड धरणातून पाणी उपसा
By Admin | Updated: February 4, 2016 22:56 IST2016-02-04T22:55:40+5:302016-02-04T22:56:18+5:30
चांदवड : बोअरवेल करून बेकायदेशीर कृत्य

राहुड धरणातून पाणी उपसा
चांदवड : चांदवड तालुक्यातील राहुड लघु पाटबंधारे धरणातील बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही रात्री अपरात्री टॅँकरच्या साहाय्याने तसेच प्रत्यक्ष धरण परिसरात बोअरवेल करून बेकायदेशीर पाणी उपसा सुरूच
आहे.
या तक्रारीनुसार चांदवडचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या आदेशानुसार तहसीलदार माणिक अहेर, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक भारती येशी, ग्रामसेवक योगेश चित्ते, बाळू गांगुर्डे, उपअभियंता ठाकरे, कोतवाल यांच्या उपस्थितीत धरणावर अचानक धाड टाकली असता धरणातील पिण्यासाठी राखून ठेवलेल्या पाण्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होता. बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांनी प्रत्यक्ष
धरणात बोअर घेऊन पाणी उपसा केला आहे.
रात्रीच्या वेळी धरणात मोटारी टाकून तसेच टॅँकरने पाणी उपसा करताना आढळून आले. त्याचा पंचनामा करण्यात आला. तर ग्रामपंचायतीने वारंवार ग्रामसभेद्वारे उन्हाळ्यात गावकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासू नये म्हणून
पाणी उपसा बंद करा, असे
भावनिक आवाहन करुनही दयेची भावना व कायद्याचा धाक न बाळगणाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पाणी उपसा सुरूच ठेवला आहे. तरी भूजल अधिनियम २०१२च्या तरतुदीनुसार संबंधित पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. (वार्ताहर)