‘मालदार’ ग्रामपंचायतींसाठी पदोन्नतीवर फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:25+5:302021-07-28T04:15:25+5:30
ग्रामसेवकांच्या पदोन्नतीचा विचार करून सोमवारी प्रशासनाने प्रारंभी तीन दिव्यांग ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणूक दिल्यानंतर सेवाज्येष्ठतेद्वारे समुपदेशनाने पदोन्नती देण्यास ...

‘मालदार’ ग्रामपंचायतींसाठी पदोन्नतीवर फेरले पाणी
ग्रामसेवकांच्या पदोन्नतीचा विचार करून सोमवारी प्रशासनाने प्रारंभी तीन दिव्यांग ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणूक दिल्यानंतर सेवाज्येष्ठतेद्वारे समुपदेशनाने पदोन्नती देण्यास सुरुवात केली असता, जवळपास सर्वच ग्रामसेवकांनी आहे त्या तालुक्यातच नियुक्ती मिळण्याचा आग्रह धरला. अन्य ठिकाणी बदलून जाण्यास त्यांनी नकार दिला तर प्रशासनाने एकाच तालुक्यात दहा ते पंधरा वर्षे नियुक्त असलेल्यांची दुसऱ्या तालुक्यात बदली करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिढा निर्माण झाला असून, या संदर्भात ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीही प्रशासनाने बैठक घेतली. परंतु, बदलून जाण्यास त्यांनी नकार दिल्याने तूर्त ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
ग्रामसेवकांच्या आडमुठेपणाचा विचार करता प्रशासनानेही आता सक्तीने घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी पदोन्नतीपात्र व अन्य ग्रामसेवकांचा नेमणुकीच्या ठिकाणच्या कालावधीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक वर्षे झालेल्यांच्या बदल्या तर करण्यात येतीलच, शिवाय पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांना बारा वर्षांच्या सेवेनंतर दिले जाणारे सर्व अतिरिक्त फायदेही गोठविण्याच्या कठोर निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू झाला आहे.