पाणीप्रश्न पुन्हा गाजणार
By Admin | Updated: January 12, 2016 00:16 IST2016-01-12T00:16:10+5:302016-01-12T00:16:57+5:30
आज महासभा : सोशल आॅडिटचा होणार पंचनामा

पाणीप्रश्न पुन्हा गाजणार
नाशिक : गेल्या तीन-चार महिन्यांपासून धगधगत असलेला पाणीप्रश्न पुन्हा एकदा मंगळवारी (दि.१२) होणाऱ्या महासभेत गाजण्याची शक्यता असून, प्रशासनाने केलेल्या सोशल आॅडिटचा पंचनामा करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही केली आहे. पाणीवाटपातील असमतोलाबद्दलही नगरसेवक आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत.
गंगापूर धरणातून पाणी जायकवाडीला सोडल्यानंतर भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महासभेने पाणीकपातीचे धोरण अवलंबिले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वीच महासभेचा एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला जात आहे. त्यानंतर महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याच्या निर्णयावरून भाजपा विरुद्ध सत्ताधारी गट यांच्यात संघर्ष उभा ठाकला आहे. सुरुवातीला शहरात पाणी मुबलक असल्याचा दावा करणाऱ्या पालकमंत्र्यांचा सूर नंतर बदलला आणि जुलैअखेर पाणी पुरवायचे असेल तर पाणीकपात आवश्यक असल्याची भूमिका घेतली. याचबरोबर सोशल आॅडिटचा आधार घेत नाशिककर पाण्याची उधळपट्टी करत असल्याचाही आरोप पालकमंत्र्यांनी केला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या महासभेत पुन्हा एकदा पाणीकपातीचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून, भाजपाला लक्ष्य करण्याची तयारी सत्ताधारी मनसेसह विरोधी पक्षांनीही केली आहे. त्याची सुरुवात मनसेचे प्रवक्ते व संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी केली आहे. अभ्यंकर यांनी पालकमंत्री आणि भाजपा आमदारांना पाणीप्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला देतानाच त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे, महासभेत सत्ताधारी मनसे अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महापालिका प्रशासनाने चोवीस तासांत केलेल्या सोशल आॅडिटचाही पंचनामा होण्याची चिन्हे आहेत. सोशल आॅडिटच्या माध्यमातून शहरातील पाणीवाटपात असमतोल निदर्शनास आल्याने प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये आहे. मंगळवारी होणाऱ्या महासभेत विषयपत्रिकेवर चर्चा होण्याऐवजी पाणीप्रश्नीच सदस्यांकडून प्रशासनाला पुन्हा एकदा घेरले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)