कडवातील पाण्याची पातळी घटली

By Admin | Updated: April 3, 2016 22:46 IST2016-04-03T22:38:10+5:302016-04-03T22:46:44+5:30

कडवातील पाण्याची पातळी घटली

The water level in the tubers decreased | कडवातील पाण्याची पातळी घटली

कडवातील पाण्याची पातळी घटली

 इगतपुरी : तालुक्यातील कडवा धरणात सिन्नर येथील नगरपालिका पाणीपुरवठा योजनेखाली ७० फूट खोल विहिरीचे काम सुरू आहे. तेथील उपसा केलेली माती कडवा धरणातच मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असल्यामुळे पाण्याची घटती पातळी चिंताजनक बनत चालली आहे. यामुळे कडवा धरणात असलेला शिल्लक जलसाठा कमी झाला आहे, याला कारण म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून सुरू झालेल्या आणि सन २०१२-१३ या कालावधीत मंजूर असलेल्या सिन्नर येथील नगरपालिका पाणीपुरवठा योजनेच्या ७० फूट विहिरीचे काम कडवा धरणात मोठ्या जोमाने सुरू आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेतून पूर्ण सिन्नर तालुक्याला या विहिरीद्वारे धरणातून ९.३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित झालेले असले, तरी तेथील सदर विहिरीची अत्यंत खराब असलेली माती विनाकारण आर. ए. घुले कंपनी कडवा धरणात आणून टाकीत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. गेल्या दशकात कडवा धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. छोट्या मोठ्या नदी-नाल्यांद्वारे धरणात ३ ते ४ मीटर गाळ वाहून आला असून, त्यात आणखीनच मातीचे ढिगारे टाकून दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. विहिरीतून मोठ्या प्रमाणात मातीची अवजड वाहने भरून कडवा धरणात संबंधित ठेकेदार आर. ए. घुले कंपनी सोडीत असल्याने धरणाची सुरक्षा वाऱ्यावर दिसत आहे. धरणाखालील निनावी, भरवीर बुद्रुक, पिंपळगाव घाडगा, अडसरे, पिंपळगाव डुकरा, सर्वतीर्थ टाकेद आदि तहानलेली गावे पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करीत आहेत. या गावांना पिण्याच्या पाण्याची व मुक्या जनावरांना चाऱ्याची टंचाई भेडसावत असताना धरणात फक्त १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सदर ठेकेदाराच्या अजब गजब कारभारामुळे भीषण दुष्काळी परिस्थितीत कडवा धरणातील उर्वरित जलसाठ्यावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. परिसरातील गावांना यामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पूर्व भागातील सर्व गावांना कडवा धरणाचा मोठा आधार आहे. परंतु मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. पूर्ण अहमदनगर जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या धरणाची जलपातळी यामुळे घटत आहे. सिन्नर नगरपालिका कडवा धरणात आरक्षित केले असून, यामुळे कॅनॉल व पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांवर पाणीकपातीचे मोठे संकट उभे राहिले आहे. येणाऱ्या काही दिवसांत पाटाच्या पाण्याचे आवर्तनदेखील कपात करण्यात येणार असून, याचा फायदा सिन्नर नगरपालिकेला होणार असल्याने येथील शेतकरी दुहेरी कात्रीत सापडले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सदर धरणात माती टाकण्यास कायदेशीर बंदी आणावी तसेच माती धरणाबाहेर टाकावी. तसे न झाल्यास सर्व नागरिक एकत्र येऊन येथील धरणात सुरू असलेले विहिरीचे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निनावी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश टोचे, साहेबराव झनकर, नामदेव साबळे, वसंत मोंढे, रंगनाथ लगड आदि परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)

 

Web Title: The water level in the tubers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.