नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात यावे असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दि. २३ आॅक्टोबर रोजी दिले. या आदेशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली तसेच उच्च न्यायालयातही या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. तथापि, न्यायालयाने दिवाळीनंतर त्यावर सुनावणी करण्याचा निर्णय दिल्यामुळे आता पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे पाटबंधारे महामंडळाने पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, त्यासाठी पोलीस खात्याला पत्र देण्यात आले आहे. तर नदीच्या दुतर्फा पाण्याची चोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज कंपनीलाही विनंती करण्यात आली असून, नदीपात्रात असलेल्या सीमेंट बंधाऱ्यांचे निडल्स काढले जात आहे. भावली, भाम या धरणातून दारणात पाणी सोडण्यात येत आहे. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर साधारणत: सोमवारी जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.
सोमवारी सोडणार जायकवाडीसाठी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:30 IST
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
सोमवारी सोडणार जायकवाडीसाठी पाणी
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त; वीजपुरवठा खंडित करणार