सोनगिरी येथे मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी

By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-01T21:30:50+5:302014-09-02T01:13:33+5:30

सोनगिरी येथे मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी

Water in houses due to heavy rains in Sonagiri | सोनगिरी येथे मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी

सोनगिरी येथे मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी

 

नायगाव : सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर शेतातील पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिसरातील सोनगिरी शिवारातील गामणे वस्तीवरील विष्णू गामणे यांच्या शेतातील घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने त्यांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. त्यामुळे घरातील धान्य, भूईमूग व संसारोपयोगी वस्तू भिजल्याने नुकसान झाले आहे. घराच्या भिंतीलाही तडा गेल्याने घर धोकादायक झाले आहे. तसेच याच परिसरातील भगवान धात्रक, अलका बोडके, रघुनाथ लहाने, राजेंद्र लहाने, सुनील लहाने आदि शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांमध्ये रात्रभर पाणी साचून राहिल्याने टमाटा, कोबी, फ्लॉवर आदि भाजीपालावर्गीय पिकांबरोबर खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, भुईमूग आदि पिकांचे नुकसान झाले आहे.
येथून कडवा कालवा गेला असून, त्याची दोन महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र हे काम करताना कालव्याच्या पुलाखालील माती काढली नसल्याने पाणी प्रवाहित होण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाचे पाणी पुलाखालून वाहून गेले नाही. ते सर्वत्र पसरल्याने शेतात घुसल्याने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या खालील मातीचा ढिगारा हटविला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. या भागातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गोदा युनियन संस्थेचे संचालक रघुनाथ लहाणे, शिवसेनेचे गटप्रमुख विष्णू गामणे आदिंसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)
श्रीपाद श्रीवल्लभ जयंती उत्साहात
तरसाळी : येथील स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीपाद श्रीवल्लभ जयंती साजरी करण्यात आली. सकाळी भूपाळी आरतीनंतर मंत्रोपचार पूजा अभिषेक करण्यात आला. नंतर श्रीस्वामी समर्थ चरित्राचे सामुदायिक वाचन करण्यात आले. नैवेद्य, आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Water in houses due to heavy rains in Sonagiri