सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीचोरी
By Admin | Updated: March 6, 2015 00:22 IST2015-03-06T00:22:09+5:302015-03-06T00:22:43+5:30
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीचोरी

सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीचोरी
नाशिक : मऱ्हळ खुर्द व मऱ्हळ बुद्रुक गावाला पाणीच येत नसल्याच्या तक्रारीवरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या विशेष पथकाद्वारे केलेल्या तपासणीत कणकोेरी चार गावे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाइपलाइनमधून परस्पर पाण्याची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याप्रकरणी एका कारखान्यासह ३० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीची बैठक काल झाली. या बैठकीत उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी सभापती केदा अहेर यांनी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांनी ५० पैसे आणेवारी झालेल्या गावांच्या नुकसानीचे पंचनामे करता येणार नाही, असे सांगताच ही आणेवारी खरिपाची असून, अजून रब्बीची आणेवारी होणे बाकी आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करा, असे आदेश उपाध्यक्ष प्रकाश वडजे व कृषी सभापती केदा अहेर यांनी मधुकर पन्हाळे यांना दिले आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा योजना पूर्ण असतानाही वीजजोडणी झालेली नाही, अशा योजनांचा आढावा घेऊन यापुढे जर योजना पूर्ण असतील आणि पाणीपुरवठा योजनांना वीजजोडणी नसेल तर त्याला उपअभियंता व शाखा अभियंता यांनाच जबाबदार धरले जाईल, असे आदेश उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश दिले.