पूर्व प्रभागमध्ये पाणीप्रश्नी वादळी चर्चा
By Admin | Updated: March 29, 2016 23:44 IST2016-03-29T23:31:23+5:302016-03-29T23:44:50+5:30
पूर्व प्रभागमध्ये पाणीप्रश्नी वादळी चर्चा

पूर्व प्रभागमध्ये पाणीप्रश्नी वादळी चर्चा
इंदिरानगर : मनपाच्या पूर्व प्रभाग समिती सभेत पाणी आणि आरोग्यप्रश्नी वादळी चर्चा होऊन सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी मलेरिया विभागाचे अधिकारी नेहमीच गैरहजर राहात असल्याने संंबंधित अधिकाऱ्यास मूळसेवेत परत पाठविण्याची सूचना सदस्यांनी केली.
पूर्व प्रभाग सभापती शबाना पठाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी पाणीप्रश्नी वादळी चर्चा झाली. गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने पुढील तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे गुरुवारी पहाटेच जलकुंभ भरून ठेवावे. पूर्व प्रभागात टॅँकरची संख्या वाढवावी. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केल्यास टॅँकर मिळत नाही, परंतु मंगल कार्यालयांना मात्र लगेच टॅँकर उपलब्ध होत असल्याची तक्रार सदस्यांनी केली. पाण्याच्या मोटारी जप्त करण्याची मोहीम राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दलही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. धूर व औषध फवारणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बांधकाम साहित्य पडून आहे. वडाळागावात गटारी तुंबल्या आहेत. तीन ठिकाणी चेंबर फुटल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. हातपंप दुरुस्तीही होत नाही आणि नवीन पंपाचे कामही होत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. (वार्ताहर)