गुरुवारपासून पाणीकपात
By Admin | Updated: October 3, 2015 22:48 IST2015-10-03T22:46:33+5:302015-10-03T22:48:17+5:30
एकवेळ पुरवठा : अनेक ठिकाणी वेळापत्रकात होणार बदल

गुरुवारपासून पाणीकपात
नाशिक : यंदा पावसाने पुरेशा प्रमाणात हजेरी न लावल्याने धरणातील उपलब्ध साठा बघता नाशिक महापालिकेने अपेक्षेप्रमाणे पाणीकपातीची घोषणा केली असून, येत्या गुरुवारपासून (दि.८) शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, तर ज्या ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा होतोे तेथे कमी वेळ पाणीपुरवठा करून वीस टक्केकपात करण्यात येणार आहे.
यंदा धरणात पुरेसा साठा नसल्याने पाणीकपात होण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली जात होती. पुणे महापालिकेने यापूर्वीच पाणीकपात केली होती. त्यानंतर नाशिक महापालिकेने कपात लागू केली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता ५६३० दशलक्ष घनफूट असून, त्यात तीन हजार ९५१ म्हणजेच ७०.७१ टक्के साठा आहे, तर कश्यपी धरणात ९५५ दलघफू (५१.५६ टक्के) आणि गौतमी गोदावरी धरणात ९७५ दलघफू (५१.९९टक्के) इतका साठा आहे.
सप्टेंबर महिना संपल्याने आता आणखी पावसाची आणि त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्याची शक्यता नसल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
शहरात सिडको आणि सातपूरचा काही भाग वगळता अन्य पंचवटी, नाशिकरोड, पश्चिम नाशिक आणि पूर्व नाशिक भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो. तेथे आता गुरुवारपासून एकवेळ पाणीपुरवठा होईल, तर ज्या भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे, अशा सिडको आणि सातपूरमधील काही भागात सुरुवातीला वीस टक्केआणि नंतर तीस टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्यात येणार आहे.