महापालिकेच्या पाण्यात कपात
By Admin | Updated: November 23, 2015 23:25 IST2015-11-23T23:24:11+5:302015-11-23T23:25:38+5:30
चिंतेचे ढग गडद : नाशिककरांची आठ महिने सत्त्वपरीक्षा

महापालिकेच्या पाण्यात कपात
नाशिक : पाणीप्रश्नी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत अखेर नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करण्यात आली असून, ३१ जुलैअखेर महापालिकेसाठी गंगापूर धरणातून २७०० दलघफू, तर दारणातून ३०० दलघफू पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. सुमारे आठ महिने महापालिकेला सदर पाणीसाठा जपून वापरावा लागणार असल्याने यापुढील काळात नाशिककरांवर आणखी पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. दरम्यान, नाशिककरांनी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले आहे.
शहरातील पाणीप्रश्नी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात जिल्'ातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी नाशिक महापालिकेच्या वतीने महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित होते. याप्रसंगी महापौरांनी नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणाबाबत वस्तुस्थिती कथन करत २१ नोव्हेंबर ते ३१ जुलै या २५४ दिवसांच्या कालावधीसाठी ३१३७ दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली. नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वीच शहरात २० टक्के पाणीकपात सुरू केली असल्याचेही महापौरांनी निदर्शनास आणून दिले. सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १२.३५ दलघफू पाणीसाठा उचलला जात आहे. त्यामुळे उर्वरित आठ महिन्यांच्या कालावधीसाठी मागणी केलेल्या आरक्षणात कोणतीही कपात न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सध्या गंगापूर धरणात ३४८५ दलघफू पाणीसाठा शिल्लक असून, मागणी मात्र सर्व मिळून ४९४६ दलघफू इतकी आल्याने पाणीआरक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर नाशिक महापालिकेसाठी गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ३०० दलघफू पाणी आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पाण्यात कपात करण्यात आल्याने येत्या आठ महिन्यांत पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. याबाबत महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले, महापालिकेच्या पाण्यात कपात झाली असली तरी आहे ते पाणी उर्वरित काळात कसे जपून वापरता येईल यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल. नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित असल्याचे महापौरांनी सांगितले.
महिनाभराचे पाणी वाचवावे लागणार
नाशिक महापालिकेला गंगापूर धरणातून २७०० दलघफू पाणीसाठा उपलब्ध होणार आहे आणि सदर पाणीसाठा २१९ दिवस पुरेल इतकाच आहे. ३१ जुलैपर्यंत २५४ दिवसांसाठी महापालिकेने ३१३७ दलघफू पाणीसाठ्याची मागणी केली होती. परंतु आता २७०० दलघफू पाण्यामुळे महापालिकेला सुमारे ३२ दिवस म्हणजे महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची बचत करावी लागणार असून म्हणजे सुमारे ३९४ दलघफू इतके पाणी वाचवावे लागणार आहे. अर्थातच त्यासाठी महापालिकेला पाणीकपातीची आणखी काही टक्केवारी वाढवावी लागणार आहे.