पाणीपट्टीत १३ कोटींची घट

By Admin | Updated: March 30, 2017 23:06 IST2017-03-30T23:05:57+5:302017-03-30T23:06:12+5:30

नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असली तरी यंदा ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.

Water cut down by 13 crores | पाणीपट्टीत १३ कोटींची घट

पाणीपट्टीत १३ कोटींची घट

 नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली असली तरी यंदा ठरविलेले उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. पाणीपट्टीच्या वसुलीत यंदा गतवर्षाच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल १३ कोटींची घट आहे. घरपट्टी वसुली मात्र ८१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. महापालिकेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११५ कोटी रुपये तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ४२.२५ कोटी रुपये समोर ठेवले आहे. त्यात महापालिकेने आतापर्यंत घरपट्टी ८१ कोटी ४५ लाख रुपये वसूल केली आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने १ एप्रिल १६ ते २७ मार्च १७ या काळात ८१ कोटी ५१ लाख ८ हजार ६४७ रुपये घरपट्टी वसूल केली होती. गतवर्षाच्या तुलनेत ५ लाख रुपयांची घट आहे. महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार मिळकतधारकांच्या घरांसमोर ‘ढोल बजाओ’ मोहीम सुरू केली आहे. त्याचे दृश्य परिणामही दिसून येत असून, थकबाकीदारांकडून भरणा करण्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदा मार्चअखेरपर्यंत ९० ते ९५ कोटी रुपयांपर्यंत घरपट्टी वसूल होईल, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. चालू आर्थिक वर्षात आधी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, त्यानंतर महापालिका निवडणुकीची मतदार यादी तपासणी यामुळे घरपट्टी वसुलीचा कर्मचारी वर्ग जिल्हा प्रशासनाकडे अडकला होता. त्याचाही फटका वसुलीवर बसल्याचे सांगितले जाते. घरपट्टीत मागच्या वर्षाच्या तुलनेत वसुलीत काही फरक नसला तरी पाणीपट्टीत मात्र यंदा सुमारे १३ कोटींची घट आहे. महापालिकेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४० कोटी २६ लाख ३४ हजार ३२ रुपये पाणीपट्टी वसूल केली होती. यंदा मात्र २७ मार्च अखेरपर्यंत २६ कोटी २८ लाख ३८ हजार ३८५ रुपयेच वसुली होऊ शकली आहे.

जिल्हा बॅँक अडचणीत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, मार्चच्या मध्यापर्यंत केवळ १०० कोटींचीच पीककर्ज वसुली झाल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा बॅँकेने वेळेत पीक कर्जाची थकबाकी न भरणाऱ्या सभासदांची नावे वृत्तपत्रात देण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी फोटो लावण्याचा इशारा दिल्याने शेतकरीवर्गात संताप व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

उद्दिष्टानुसार वसुली नाहीच
 जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ६ कोटी ८ लाख ८९ हजार इतके ठेवले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत ४ कोटी १५ लाख २५ हजार म्हणजेच सरासरी ७० टक्के घरपट्टी वसुली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १४ कोटी ३४ लाख ६६ हजार इतके ठेवले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ अखेर ८ कोटी ९१ लाख ९७ हजार इतकी पाणीपट्टी वसुली झाली आहे.

Web Title: Water cut down by 13 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.