घरांमध्ये पाणी शिरूनही पालिका थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 22:11 IST2016-07-14T22:10:46+5:302016-07-14T22:11:47+5:30

दावे फोल : पालिकेने दखल घेतली नसल्याच्या तक्रारी

The water cools down without water | घरांमध्ये पाणी शिरूनही पालिका थंडच

घरांमध्ये पाणी शिरूनही पालिका थंडच

 नाशिक : गेल्या तीन ते चार दिवस संततधार सुरू असल्याने महापालिकेने धावपळ करून नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक केली असल्याचा दावा केला असला तरी गंगापूर आणि संभाजी चौकातील नागरिकांना मात्र वेगळाच अनुभव आला. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
गेल्या शनिवारपासून शहरात संततधार सुरू झाली. मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यादरम्यान शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने तातडीने उपाययोजना केल्याचा दावा प्रशासनाने केला आणि नागरिकांच्या घरातील पाणी उपसले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र अनेक तक्रारींना दाद मिळाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गंगापूररोडवर प्रसाद मंगल कार्यालयाजवळ नक्षत्र कॉलनी येथे अशाच प्रकारे रस्त्यावर तुंबलेले पाणी गटारींमध्ये शिरून आणि त्यानंतर पुढील भागात चेंबरमधून निघालेले पाणी सुनील मटाले, भीमाबाई देवरे आणि अन्य चार ते पाच नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नागरिकांनी यासंदर्भात पश्चिम विभाग कार्यालयाशी संपर्क साधला, मात्र हे काम पाणीपुरवठा विभागाचे तर कधी बांधकाम तर कधी गटार विभागाचे असल्याचे सांगत टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीचे किशोर शिरसाट यांनी केली आहे.
संभाजी चौकात तर नागरिकांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाल्याने पालिकेकडे तक्रार करून कोणताही उपयोग झाला नसल्याची तक्रार भाजपाच्या अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली आहे. संभाजी चौकात या घरांच्या जवळूनच जाणाऱ्या नासर्डी नदीपात्राला पूर आल्याने येथील रस्त्याचा काही भाग खचून झाडे उन्मळून पडली. त्यामुळे नागरिकांचा मार्गच बंद झाला.
यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणी त्याची दखल घेतली नसल्याचे गणेश कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The water cools down without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.