महापौरांच्या भागातून पाण्याच्या तक्रारी
By Admin | Updated: April 28, 2017 02:10 IST2017-04-28T02:10:11+5:302017-04-28T02:10:20+5:30
नाशिक : पंचवटी विभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२७) विभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीचा आढावा घेतला

महापौरांच्या भागातून पाण्याच्या तक्रारी
नाशिक : पंचवटी विभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२७) विभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीचा आढावा घेतला. यावेळी विभागातील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याविषयी तक्रारींचा पाऊस पाडत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, महापौरांनी विभागातील जुन्या पाइपलाइन बदलण्याचे निर्देश देतानाच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
ग्वाल्हेर येथील महापौर परिषद आणि पुणे येथील भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहून नाशकात गुरुवारी परतलेल्या महापौर रंजना भानसी यांनी तातडीने सायंकाळी पंचवटी विभागातील पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक बोलाविली. या बैठकीला पंचवटी विभागातील सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याविषयी तक्रारींचा पाऊस पाडला. पंचवटीतील कलानगर, पटेलपट्टी, कुमावतनगर, शिंदेवस्ती, दुर्गानगर आदी भागांत पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. यावेळी अरुण पवार यांनी पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडणी देऊच नये, अशी भूमिका घेतली तर गुरुमित बग्गा यांनी वैयक्तिक स्तरावर नळजोडणी देण्यास विरोध दर्शविला. यावेळी महापौर रंजना भानसी यांनीही दोन जलकुंभ बांधूनही प्रभातनगर भागात पाणी पोहोचत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांकडून पंचवटी विभागात एकूण २२ जलकुंभ असल्याचे सांगण्यात आले, परंतु दुर्गानगर येथील पाण्याची टाकी बांधूनही त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्याठिकाणी तातडीने उपाययोजनेचेही आदेश महापौरांनी दिले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी पंचवटी विभागात बव्हंशी ठिकाणी जुन्या पाइपलाइन असल्याने त्या बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, महापौरांनी सदर पाइपलाइन बदलण्याचे निर्देश देतानाच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कल्या.
याशिवाय, पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याबरोबरच तेथील गळती शोधून ती थांबविण्याचेही आदेशित केले. बैठकीला नगरसेवक विमल पाटील, हेमंत शेट्टी, प्रा. सरिता सोनवणे, भिकूबाई बागुल, कमलेश बोडके, पूनम धनगर, पूनम सोनवणे, सुनीता पिंगळे, प्रियंका माने, पुंडलिक खोडे, जगदीश पाटील आदीसह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाणके, धर्माधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)