अनेकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी

By Admin | Updated: January 14, 2017 00:17 IST2017-01-14T00:16:22+5:302017-01-14T00:17:19+5:30

आरक्षणाचा फटका : नारायणगाव गणात चुरशीची लढत

Water circulating on many people | अनेकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी

अनेकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी

 योगेश सगर कसबे सुकेणे
कसबे सुकेणे गट यंदा अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटातील विद्यमान सदस्यासह अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. गेल्या निवडणुकीत या गटावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले. यंदा सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी आणि भाजपाने येथे कंबर कसली आहे. या गटात नारायणगाव गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने याच गणात यंदा चुरस दिसेल़
निफाड तालुक्याच्या राजकारणात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या गटात आरक्षणामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. विद्यमान आमदार अनिल कदम ज्या गटातून जिल्हा परिषदेत निवडून गेले तो ओझर टाऊनशिप - सुकेणा हा पूर्वीचा गट होता. २००७च्या पुनर्निर्मितीमध्ये कसबे सुकेणे हा स्वतंत्र गट झाला. २००७च्या निवडणुकीत हा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आला. राष्ट्रवादीचे भास्कर गांगुर्डे येथून विजयी झाले तर कसबे सुकेणे गणातून वडाळीचे राष्ट्रवादीकडून सुभाष होळकर, तर सेनेकडून दीक्षीच्या लता गाढवे निवडून आल्या. लताताई गाढवे यांनी याच गणातून निफाड पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले. २०१३च्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत कसबे सुकेणे गटावर परत भगवा फडकविला. गटात सेनेच्या भावना विश्वास भंडारे, गणात रोहिणी झाल्टे आणि विनायक चौधरी हे तिघेही शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपाने गेली निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खेरवाडी गाव आणि दीक्षी गावांची मतविभागणी या निवडणुकीत निर्णायक ठरत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरली. या गटात यंदा सेनेकडून गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपाने संघटन मजबूत केले आहे. गटात शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, अशोक भंडारे, केशव झाल्टे, विनायक चौधरी यांचे संघटन आहे. नारायणगाव गणात सेनेचे प्राबल्य अधिक असल्याने या गणात शिवसेनेचे स्थानिक नेते आनंदराव बोराडे, यशवंत चौधरी, विजय मोगल, वसंत चौधरी, चिंधू तात्या चौधरी, केशवराव बोरस्ते, विलास गडाख, राजेंद्र पवार, विजय नागरे, सुभाष आवारे, वसंत गुरगुडे यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या डझनभर संख्येमुळे या गणात तिकीट वाटपात शिवसेनेला अनेकांची मनधरणी करावी लागणार हे मात्र नक्की. काँग्रेसचे राजेंद्र मोगल, प्रतापराव मोगल, सर्जेराव मोगल, दीपक बोरस्ते, कमलेश भंडारे, राष्ट्रवादीचे नाना पाटील, भाऊसाहेब भंडारे, अश्विनी मोगल, माजी सदस्य भास्कर गांगुर्डे, आनंद भंडारे, सचिन पाटील, संदीप पवार, पिंपळगाव बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती धनवटे यांनीही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपाकडून इच्छुकांची संख्या जेमतेम असली तरीही सुदाम जाधव, दत्ता पाटील आदिंनी पक्षीय पातळीवर तयारी सुरू केली आहे. कसबे सुकेणे गट जिल्हा परिषदेसाठी उमेदवार देण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र उमेदवारांची चाचपणी करून विजयासाठी रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. नारायणगाव गणात अटीतटीची लढत होईल. या गणातून उमेदवारी मिळविण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात चढाओढ आहे.

Web Title: Water circulating on many people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.