दहा तासांत ११ हजार झाडांना पाणी
By Admin | Updated: May 22, 2016 22:51 IST2016-05-22T22:46:12+5:302016-05-22T22:51:38+5:30
युवा वृक्षप्रेमींचे देवराईवर श्रमदान

दहा तासांत ११ हजार झाडांना पाणी
नाशिक : आपलं पर्यावरण संस्थेचे तरुण वृक्षप्रेमी उगवत्या दिनकराच्या साक्षीने सातपूरजवळच्या ‘देवराई’वर जाऊन दर शनिवारी व रविवारी सर्व झाडांना दुपारपर्यंत पाणी टाकतात; मात्र या रविवारी (दि. २२) संस्थेच्या पंधरा-वीस स्वयंसेवकांनी दहा तासांत अकरा हजार झाडांना पाणी देऊन आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला.
वन विभागाच्या सातपूर येथील फाशीच्या डोंगरावर गेल्या वर्षी पर्यावरण दिनाला आपलं पर्यावरण संस्थेने ‘वनमहोत्सव’ आयोजित केला होता. यादिवशी नाशिककरांनी एकत्र येऊन प्रथमच अकरा हजार रोपांची नियोजनबद्ध लागवड के ली होती. पुढील तीन वर्षे येथील रोपांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी आपलं पर्यावरणने घेतली असून त्या दृष्टिकोनातून आठवड्यातून दोन दिवस डोंगरावर ४५ एकरांमध्ये लावलेल्या झाडांना पाणी देण्याचे कार्य केले जाते. अकरा महिन्यांमध्ये सर्वच रोपट्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. या ठिकाणी जैवविविधतेची जोपासना करणारे भारतीय प्रजातीची झाडे लावण्यात आली आहे. प्राणी-पक्ष्यांना हक्काचा अधिवास व खाद्य कसे उपलब्ध होईल, याचा विचार करून दूरदृष्टी बाळगून लावलेल्या झाडांचे संगोपन क रण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराची देवराई साकारण्यासाठी अविरत परिश्रम आपलं पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य घेत आहेत.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्याच्या संकल्पनेतून आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांच्यासह अक्षय भोगले, सुजाता काळे, गौरी गायकवाड, पूनम रानडे, संध्या जैन, मिलिंद मुंढे, घनश्याम सपकाळे, सचिन तुपे, विपिन बच्छाव, सौरभ भोगले, राजू भालेराव, डॉ. विजय गवळी, निकिता कुलकर्णी, रोहिणी आयरेकर, कौस्तुभ शुक्ल, तुषार गांगुर्डे, सुरेश नखाते आदिंनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत तब्बल दहा तास झाडांना पाणी दिले. (प्रतिनिधी)