भंगार बाजारला प्रतिबंध घालण्यासाठी टेहळणी पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 14:29 IST2017-10-13T14:29:42+5:302017-10-13T14:29:55+5:30

भंगार बाजारला प्रतिबंध घालण्यासाठी टेहळणी पथक
नाशिक - सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये, यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त टेहळणी पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.
महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची मोहीम फत्ते केली होती. परंतु, काही महिन्यांतच पुन्हा एकदा भंगार बाजार बसला. त्यामुळे महापालिकेला पुन्हा कारवाईचे हत्यार उपसावे लागले. आता महापालिकेने कारवाई पूर्ण केल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये याकरीता खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी सातपूर-अंबड लिंकरोडवर कायमस्वरुपी टेहळणी पथक तैनात केले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. भंगार बाजार पुन्हा बसू नये, याकरीता पोलिसांची मदत लागणार असून संयुक्त पथक स्थापण्यासाठी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, भंगार बाजाराच्या जागेवर नियमानुसारच बांधकामांची परवानगी दिली जाणार आहे. बेकायदेशीररित्या कोणतेही बांधकाम तेथे उभे राहू दिले जाणार नाही. नगररचना विभागाकडे ज्या व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना नियमानुसार ६० दिवसांच्या आत परवानगी दिली जाईल. दरम्यान, महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मोहिमेत जप्त करण्यात आलेला भंगार माल सातपूर क्लब हाऊसच्या जागेत ठेवला जात आहे. नियमानुसार लिलाव प्रक्रिया राबवून त्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.