श्रेयवादाच्या लढाईमुळे निवडणुकांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:51+5:302021-07-25T04:13:51+5:30

सिन्नर (शैलेश कर्पे) : कोरोनाचा ज्वर ओसरू लागल्यानंतर सिन्नर तालुक्यात राजकीय ज्वर वाढू लागला आहे. झालेल्या व होऊ घातलेल्या ...

Watching the election due to the battle of credulity | श्रेयवादाच्या लढाईमुळे निवडणुकांचे वेध

श्रेयवादाच्या लढाईमुळे निवडणुकांचे वेध

सिन्नर (शैलेश कर्पे) : कोरोनाचा ज्वर ओसरू लागल्यानंतर सिन्नर तालुक्यात राजकीय ज्वर वाढू लागला आहे. झालेल्या व होऊ घातलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. श्रेयावादाच्या या लढाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याची चाहूल कार्यकर्ते व मतदारांना लागली आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस या महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे जवळ आलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या महाविकास आघाडीच्या एकजुटीची आता अग्निपरीक्षा होणार आहे. सिन्नर नगरपरिषदेची मुदत दिवाळीच्या आसपास संपत आहे. नगरपरिषदेची मुदत संपते ना संपते तोच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, सिन्नर बाजार समिती व सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. सिन्नर बाजार समितीच्या संचालक मंडळाचीही मुदत संपली आहे. त्यामुळे सिन्नरला आगामी काही दिवसात राजकीय आखाडा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सिन्नरचा राजकीय इतिहास पाहिला तर पक्षापेक्षा व्यक्तीला मानणारे कार्यकर्ते आणि मतदार आहेत. आपला नेता ज्या पक्षात जातो त्या पक्षात कार्यकर्ते सक्रिय होत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला. माणिकराव कोकाटे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊनही पक्षाची मोट बांधून विजयी होण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून आले.

सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, कॉँग्रेस, मनसे, प्रहार संघटना यांच्यासह छोट्या पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यामुळे आगामी काळात त्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. आता तोंडावर नगरपरिषदेची निवडणूक आहे. गेल्या वेळी सिन्नर नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक झाली होती. यावेळी नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक होणार नसली तरी नगरसेवकांच्या २८ जागांसाठी अटीतटीच्या लढती होणार हे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. गेल्या वेळी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्यावेळी राजाभाऊ वाजे विद्यमान आमदार होते. त्यामुळे त्यांनी नगरपरिषदेत सत्ताबदल करून दाखविला. आता आमदार बदलल्याने नगरपरिषदेच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी व पंचायत समितीच्या बारा गणांसाठी अटीतटीच्या लढती पाहायला मिळतील. बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळाही याच काळात उडणार आहे. सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्याने या ठिकाणीही निवडणूक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, राजाराम मुरकुटे यांनी व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. तर शिवसेनेकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, प्रहारचे शरद शिंदे यांच्यासह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला प्रारंभ केला आहे.

------------------

महाआघाडी की महाबिघाडीकडे नजरा

सिन्नर तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्तीला मानणारे लोक आहेत. सध्या विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आहेत. तर माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे शिवसेना पक्षात आहे. तालुक्यात सध्या कोकाटे व वाजे-सांगळे या गटांतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगणार आहेत. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना, कॉँग्रेस यांच्यात महाआघाडी असली तरी तालुक्यात महाआघाडी होणे सध्या तरी अशक्य वाटत आहे. त्यामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, स्टाईस या निवडणुकीत स्थानिक नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागून असणार आहेत.

------------------

१) माणिकराव कोकाटे

२) राजाभाऊ वाजे

३) उदय सांगळे

Web Title: Watching the election due to the battle of credulity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.