सांडपाणी व्यवस्थापन; २५ टक्के तरतूद करा
By Admin | Updated: January 15, 2015 00:01 IST2015-01-15T00:01:04+5:302015-01-15T00:01:14+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महानगरपालिकेला आदेश

सांडपाणी व्यवस्थापन; २५ टक्के तरतूद करा
नाशिक : महापालिकेमार्फत सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रांमध्ये सोडले जात असल्याने पर्यावरणाची हानी होत असून, महापालिकेने परिपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन आणि नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वर्षी एकूण भांडवली खर्चापैकी २५ टक्के तरतूद करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिक महापालिकेला केली आहे. याबाबत स्थायी समिती व महासभेची मान्यता घेऊन पूर्तता अहवाल सादर करण्याचे आदेशही मंडळाने दिले आहेत. दरम्यान, येत्या महासभेवर सदरचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणारे घरगुती सांडपाणी गोळा करून व त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि तसे संमतीपत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेणे बंधनकारक आहे. याचबरोबर घनकचऱ्याबाबतही योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र नाशिक महापालिकेने संपूर्ण सांडपाण्याचे संकलन व प्रक्रिया करण्याकरिता परिपूर्ण योजना आजतागायत कार्यान्वित केली नसल्याने सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडून दिले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व सांडपाणी एकत्र करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा बसवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी तसेच घनकचऱ्याबाबतही योग्य विल्हेवाट लावावी.
यासाठी महापालिकेने एकूण भांडवली खर्चात २५ टक्के तरतूद करून ते या प्रकल्पावर खर्च करावे व कायदेशीर पूर्तता पार पाडावी, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने २५ टक्के तरतूद करण्यासंबंधीचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवला असून, महासभा व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर तसा अहवाल मंडळाला सादर केला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)