हजारो लिटर पाणी वाया : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: August 23, 2016 01:05 IST2016-08-23T01:04:56+5:302016-08-23T01:05:57+5:30
पाथर्डी फाटा येथे व्हॉल्व्हमधून पाणीगळती

हजारो लिटर पाणी वाया : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा चौकातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांवरील मोठमोठ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन पाणी वाया जात असून, पाण्याचे पाट वाहताना पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनदेखील पाणीगळती थांबवली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्हॉल्व्हचे चेंबर उघडे ठेवल्यानेच व्हॉल्व्ह नादुरुस्त करून पाणीगळती घडवून आणली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाथर्डी फाटा येथील जलकुंभामधून सिडको, इंदिरानगर, वासननगर, प्रशांतनगर व अन्य मोठ्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. परिणामी पाथर्डी फाटा चौकात जलवाहिन्यांवरचा व्हॉल्व्ह झोन तयार झाला आहे. सर्व दिशांना जलवाहिन्यांवर मोठमोठे व्हॉल्व्ह आणि त्यांचे चेंबर्स आहेत. पाणीपुरवठा हा महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असूनदेखील पाथर्डी फाट्यावरील बहुसंख्य व्हॉल्व्हचे चेंबर्स मात्र उघडे ठेवून देण्यात आले आहेत.
या उघड्या चेंबर्समधील व्हॉल्व्हशी कधी-कधी परिसरातील व्यावसायिक छेडछाड करून गळती निर्माण करतात, तर कधी संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्हॉल्व्ह नादुरु स्त होतात. पाणी सोडायच्या वेळेत नादुरु स्त व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊन ते रस्त्याने वाहू लागते. गेल्या चार-पाच दिवसांपासून रात्री आठ ते नऊच्या दरम्यान उड्डाणपुलाखालच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून सर्व्हिस रस्त्यावर या वेळेत पाण्याचा पाट वाहत असतो.
याविषयी मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारले असता, नागरिकांनीही कळवल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना दुरु स्तीसाठी पाठवल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पाण्याची गळती सुरूच राहिली. या भागातील अनेक व्हॉल्व्हच्या चेंबर्सना झाकण किंवा जाळ्या नसल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात असल्याने व्हॉल्व्ह वारंवार नादुरुस्त होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. व्हॉल्व्ह दुरुस्त करून संरक्षित करण्याची मागणी बी. व्ही. गायकवाड, राहुल निकुंभ, तुषार गायकवाड, विजय सोनवणे, मेघश्याम नवले आदिंनी केली आहे. (वार्ताहर)