सटाण्यात दोन सदस्यांची प्रभागरचना कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:30+5:302021-09-24T04:16:30+5:30
येथील पालिकेच्या कारभाऱ्यांची येत्या डिसेंबर अखेरीस मुदत संपत आहे. गेल्यावेळी भाजपा-सेनेचे सरकार असल्यामुळे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक व दोन ...

सटाण्यात दोन सदस्यांची प्रभागरचना कायम
येथील पालिकेच्या कारभाऱ्यांची येत्या डिसेंबर अखेरीस मुदत संपत आहे. गेल्यावेळी भाजपा-सेनेचे सरकार असल्यामुळे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक व दोन सदस्यीय प्रभाग ठेवण्यात आले होते. २१ सदस्य संख्या असलेल्या पालिकेत गेल्या निवडणुकीत दहा प्रभागांची रचना करून प्रभाग क्रमांक ९ चे तीन सदस्य वगळता उर्वरित नऊ प्रभागांमध्ये दोन सदस्य होते. यंदा मात्र आघाडी सरकारने थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक रद्द करून सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याने प्रभागातील निवडणुका आता चुरशीच्या होणार आहेत. शासनाच्या निर्णयाने मात्र इच्छुक आपल्या कामाला लागल्याने राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. विद्यमान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनीदेखील प्रभाग निवडण्यासाठी चाचपणी सुरू केली असून प्रभाग क्रमांक सात, चार व दोन या प्रभागांची त्यांनी चाचपणी सुरू केली आहे . दुसरीकडे सर्वच पक्षांनी प्रत्येक प्रभागात इलेक्टीव्ह मेरीटचे उमेदवार गळाला लावण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. तर दुसरिकडे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पुन्हा शहरविकास आघाडीच्या बॅनरखाली मोट बांधली असून ते सर्वच पक्षांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.