प्रभाग बैठकीचे वाजले बारा
By Admin | Updated: November 3, 2015 21:23 IST2015-11-03T21:21:20+5:302015-11-03T21:23:08+5:30
अधिकारी सभागृहात : नगरसेवक पाण्याच्या आंदोलनात

प्रभाग बैठकीचे वाजले बारा
पंचवटी : घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अधिकारी कामे ऐकत नाही, मनपा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे असा आरोप करून सोमवारी प्रभाग समितीची मासिक बैठक तहकूब करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मंगळवारी होणाऱ्या प्रभागाच्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने पंचवटी प्रभागाच्या मासिक बैठकीचे बारा वाजल्याचे दिसून आले.
सोमवारच्या दिवशी आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारावरून तहकूब केलेली सभा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले खरे; मात्र जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडू नये या आंदोलनासाठी भाजपा वगळता सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी हजेरी लावल्याने दुपारी एक वाजेपर्यंत सभागृहात विभागीय अधिकारी तसेच, पाणीपुरवठा, उद्यान, नगररचना, विद्युत व अन्य अधिकारी आणि कॉँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे हे ठाण मांडून बसलेले होते. दुपारी सव्वा वाजता सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक मनीषा हेकरे, रूपाली गावंड व त्यानंतर सिंधू खोडे यांनी हजेरी लावली खरी; मात्र सदस्य संख्या अपूर्ण असल्याने त्यांनाही प्रतीक्षा करावी लागली. दुपारी दीड वाजेपर्यंत सभा झालेली नव्हती. सोमवारी प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पाणीप्रश्न आंदोलनात सहभागी होत प्रभागाच्या बैठकीकडे पाठ फिरविल्याचीच चर्चा होती. भाजपाच्या नगरसेवक रंजना भानसी, शालिनी पवार यांनी प्रभाग सभा सुरू होण्यापूर्वी विभागीय कार्यालयात हजेरी लावली; मात्र सर्वच लोकप्रतिनिधी पाणी प्रश्नाच्या आंदोलनात गेल्याचे समजताच त्यांनी विभागीय कार्यालयातून काढता पाय घेतला. (वार्ताहर)