रेशन पुरवठ्यासाठी नाशकात ‘वॉर रूम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:42 IST2020-04-13T23:42:40+5:302020-04-13T23:42:52+5:30
कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा खात्याने नाशकात ‘ वॉर रूम’ उघडली असून, आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत.

रेशन पुरवठ्यासाठी नाशकात ‘वॉर रूम’
नाशिक : कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्येला रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा खात्याने नाशकात ‘ वॉर रूम’ उघडली असून, आपल्या सहकाऱ्यांसह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यात ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत.
लॉकडाउनच्या काळात राज्याच्या एकूण लोकसंख्येतील निम्म्या लोकसंख्येच्या पोटाची भूक शमविण्याचे मोठे आव्हान पुरवठा विभागावर आहे. राज्यातील १२ कोटी लोकसंख्येपैकी रेशनवरील धान्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ७ कोटी इतकी असून, इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या उदर भरणाची जबाबदारी सरकारवर येऊन पडली आहे. त्यासाठी भुजबळ यांनी नाशकातील आपल्या निवास्थानातूनच ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले आहे.
यासाठीचा वॉररूम चोवीस तास कार्यान्वित असून, प्रतिदिनी किमान हजार ते बाराशे तक्रारी यावर प्राप्त होत आहेत. लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या सुमारे पाच लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था राज्यात ४ हजार ५२३ ठिकाणी करण्यात आली आहे.
स्थलांतरितांसाठी विशेष योजनेची मागणी
स्थलांतरित अथवा ज्यांचे कोणतेही कार्ड नाही अशा राज्यातील सुमारे २ कोटी नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष योजना द्यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे सोमवारी (दि.१३) झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली आहे.
मे-जून महिन्यात होणार धान्याचे वाटप
लॉकडाउनची परिस्थिती पाहता केशरी शिधापत्रिका धारकांनाही रेशनचे धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, राज्यातील ३ कोटी ८ लाख पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. मे आणि जून महिन्यात या धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
रोज मजुरी करून गुजराण करणाºया सामान्यातील सामान्य व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्यात मुबलक
धान्याचा साठा उपलब्ध आहे. त्याची चिंता करू नये. शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजूंनाही धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात या कामी महाराष्ट्र अव्वल आहे.
- छगन भुजबळ,
अन्न व नागरी पुरवठामंत्री