वणी परिसरात कारले ३५ रुपये किलो !
By Admin | Updated: June 27, 2017 01:34 IST2017-06-27T01:34:31+5:302017-06-27T01:34:43+5:30
वणी : कृषी उत्पादित वस्तूंना समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाकडून ठेवण्यात येते; मात्र विविध अडचणी उभ्या ठाकतात व नैराश्याचे वातावरण निर्माण होते;

वणी परिसरात कारले ३५ रुपये किलो !
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कृषी उत्पादित वस्तूंना समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाकडून ठेवण्यात येते; मात्र विविध अडचणी उभ्या ठाकतात व नैराश्याचे वातावरण निर्माण होते; मात्र सध्या कारले या पिकाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला असून, सुमारे ३० ते ३५ रु पये प्रतिकिलोचा दर उत्पादकांना मिळत असल्याने उत्पादकांत उत्साहाचे वातावरण असून, कडू कारल्याच्या गोड कहाणीमुळे उत्पादक खुशीत आहेत. वणी-कळवण रस्त्यावरील शेतजमिनीत साधारणत: एप्रिल महिन्यात कारल्याची लागवड काही उत्पादकांनी द्राक्षबागेत करून आंतरपीक उत्पादनाचे नियोजन केले होते. सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेण्यास अग्रक्रम दिला. रोपवाटिकेतून कारल्याचे रोप आणून ६३९ अशा अंतरात लागवड केली. ७५० रोप लागवड एक एकर क्षेत्रात करण्यात आली. चार ट्रॅक्टर शेणखत रोगप्रतिबंधक फवारणी व तत्सम बाबींच्या समावेशपासून लागवड ते उत्पादन अशा द्राविडी प्राणायामासाठी एकरी ३० हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती उत्पादक गणेश देशमुख यांनी दिली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या १५ किलो क्रेटला दर्जा व प्रतवारी पाहून ५०० रुपये दर मिळत आहे. एकदा उत्पादन सुरू झाल्यानंतर चार महिन्यापर्यंत उत्पादन घेण्यात येते तसेच दोन दिवसाआड खुडणी करण्यात येते. दरम्यान कारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांच्या कष्टाचे चीज केल्याने उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शेती उत्पादने घेण्यास सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने कडू कारल्याची गोड चव चाखता आली, अशी माहिती उत्पादक रवींद्र पवार व कचरू पवार यांनी दिली.