भटक्या कुत्र्यांवर मायेची सावली...
By Admin | Updated: October 13, 2015 00:12 IST2015-10-13T00:11:46+5:302015-10-13T00:12:58+5:30
भटक्या कुत्र्यांवर मायेची सावली...

भटक्या कुत्र्यांवर मायेची सावली...
रस्त्यात श्वान दिसले की, बहुतेकांच्या तोंडी ‘हाड-हाड’ असेच शब्द येतात. मग या कुत्र्यांना प्रेम, लळा लावणे दूरच. बरेच जण घरात कुत्री पाळतात, त्याची सगळी काळजीही घेतात. रस्त्यावरच्या कुत्र्यांकडे पाहून मात्र नाके मुरडतात. अशाच बेवारस कुत्र्यांसाठी काठे गल्ली येथील सुखदा गायधनी ही युवती गेल्या चार वर्षांपासून जिद्दीने काम करीत आहे. सुखदाला लहानपणापासून प्राण्यांची प्रचंड आवड. चार वर्षांपूर्वी तिने ठाण्याहून पाश्चात्त्य प्रजातीचे कुत्र्याचे पिलू पाळण्यासाठी घरी आणले. त्याच्याशी खेळायला बाहेरची कुत्रीही घरात येऊ लागली. मग सुखदाने या भटक्या कुत्र्यांचीही काळजी घ्यायला सुरुवात केली. रस्त्यावर एखादे कुत्रे आजारी दिसले की, ती त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ लागली, जखमी कुत्र्यांवर प्रथमोपचार करू लागली, त्यांना इंजेक्शन्स देऊन आणू लागली. काही महिन्यांपूर्वीच निधन झालेले सायकलपटू हर्षद पूर्णपात्रे हे तिच्या परिचयाचे. त्यांच्या मदतीने तिला आणखी सहकारी येऊन मिळाले. विमल ममानिया, निखिल पुरोहित, देविका भागवत आदि २०-२२ तरुण-तरुणींनी मिळून ‘अॅनिमल केअर एम्पॉवर्ड’ नावाचा ग्रुप स्थापन केला. आता या गु्रपच्या स्वयंसेवकांना शहराच्या निरनिराळ्या भागांतून फोन येतात. त्या भागातला स्वयंसेवक जाऊन कुत्र्यावर उपचार करतो, डॉक्टरकडे नेतो, कुत्रा बरा होईपर्यंत स्वत:च्या घरी नेऊन त्याची शुश्रूषाही करतो. बऱ्याचदा डॉक्टरही या कुत्र्यांवर मोफत उपचार करतात. आजार गंभीर असेल तर ग्रुपचे स्वयंसेवक खिशातून पैसे टाकून उपचार करवून घेतात. शहरात कुत्र्यांसाठी निवाराघर बांधण्याचा या ग्रुपचा प्रयत्न असून, त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. सुखदा ही भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठीही प्रबोधन करते. महापालिकेलाही ती मदत करते. या शस्त्रक्रियांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करवून घ्यायला हव्यात, असे तिचे म्हणणे आहे. कुत्र्यांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहू नये. कुत्रा हा ठरावीक ठिकाणी समूहाने राहणारा प्राणी आहे. कुत्री रात्री आपापल्या भागाचे रक्षण करतात. कोणी नवा माणूस दिसला की, त्याच्या अंगावर धावून जातात खरी; पण चावण्याच्या घटना खूप कमी घडतात. उलट माणसेच कुत्र्यांना दगड वगैरे मारून उपद्रव देतात. मग त्याचा राग मनात धरून कुत्री कधीकधी हिंसक होतात. माणसांनी कुत्र्यांविषयीची मानसिकता बदलायला हवी, असे सुखदा तळमळीने सांगते. सुखदाचे हे काम जसे ‘हटके’ आहे, तसेच ते प्राण्यांविषयी समाजाला नवा दृष्टिकोन देणारेही ठरत आहे.