रस्त्यात वटवृक्ष पडल्याने जीव मुठीत धरून प्रवास
By Admin | Updated: June 19, 2017 00:35 IST2017-06-19T00:35:02+5:302017-06-19T00:35:20+5:30
रस्त्यात वटवृक्ष पडल्याने जीव मुठीत धरून प्रवास

रस्त्यात वटवृक्ष पडल्याने जीव मुठीत धरून प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
बेलगाव कु्नऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाकडे जाणाऱ्या अस्वली स्टेशन ते साकूर फाटा यादरम्यान महामार्ग क्र मांक ३७ वर गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात दीडशे वर्षीय वटवृक्ष रस्त्यात उन्मळून पडल्याने अनेक वाहनधारक प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदर विभागाने हा पडलेला वृक्ष बाजूला करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
अतिवृष्टीने हे वडाचे जीर्ण झालेले झाड महामार्गावर उन्मळून पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सिन्नर, शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना यामुळे माघारी फिरावे लागत आहे, तर जवळच असलेल्या ब्रिटिशकालीन दारणा धरणावर अनेक पर्यटक येत असतात त्यांनादेखील पुढे जाणे अवघड होऊन बसले. दरम्यान, नांदगाव बुद्रुक येथील शाळकरी व महाविद्यालयीन मुलांना हे झाड पडल्यामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना या वृक्षाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यातच काही वटवृक्ष जास्तच जीर्ण झाल्याने मृत्यूला आमंत्रण देत आहेत. या महामार्गावरून अनेक कामगार नाशिक, वाडीवऱ्हे आदी ठिकाणी कंपन्यांमध्ये रोजगारासाठी जात असतात. रात्री-अपरात्री त्यांना प्रवास करावा लागतो. महामार्गावर उन्मळून पडलेल्या वडाच्या झाडांमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. सदर विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.