महिलांच्या कुस्तीला महिला प्रेक्षकांची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 9, 2017 02:34 IST2017-05-09T02:34:32+5:302017-05-09T02:34:41+5:30
महिला खेळाडू देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवित आहेत, असे असताना महिला कुस्तीपटूंची कुस्ती पाहण्याकडे महिला प्रेक्षकच पाठ फिरवित आहेत.

महिलांच्या कुस्तीला महिला प्रेक्षकांची प्रतीक्षा
भाग्यश्री मुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तांबड्या मातीतला, अस्सल भारतीय खेळ अशी ज्याची ओळख आहे, त्या कुस्तीच्या मैदानात आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला खेळाडू आॅलिम्पिकपर्यंत धाव घेत व चांगले यश मिळवित देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवित आहेत, असे असताना दुर्दैवाने महिला कुस्तीपटूंची कुस्ती पाहण्याकडे महिला प्रेक्षकच पाठ फिरवित आहेत. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात अशाप्रकारची परंपरा नसल्याचे सांगत मुलींना कुस्तीच खेळू दिली जात नसल्याचेही आढळले आहे.
महिला कुस्तीपटू गीता फोगट हिने आॅलिम्पिक स्पर्धेत महिला कुस्तीचा झेंडा रोवला. त्यावरच आधारित ‘दंगल’ चित्रपटाने महिलांची कुस्ती घरोघर पोहोचवली. महिलांच्या कुस्तीचा त्यामुळे प्रसार झाला आणि मुलींचे या खेळाकडे येण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज तांबड्या मातीत कसून सराव करत आणि दमदार कामगिरी करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना प्रत्यक्ष आखाड्यांमध्ये जाऊन कुस्ती खेळताना महिला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन, पाठिंबा मात्र मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये काही प्रमाणात प्रेक्षक लाभतही असले तरी छोट्या खेड्यांमध्ये मात्र महिला प्रेक्षकांची उपस्थिती तर नसतेच, पण महिला कुस्तीचे सामनेही होऊ दिले जात नाही. ‘मुलींची कुस्ती लावण्याची व पाहण्याची प्रथा नाही’ असे कारण देत महिला कुस्तीपटूंचे सामनेच होऊ दिले जात नाही. महिला कुस्तीपटू प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणानुसार, केलेल्या सरावानुसार खेळ सादर करण्यास उत्सुक असतात. स्थानिक ते देशपातळीपर्यंत, प्रसंगी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्या निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात, चमकदार कामगिरी करत बक्षिसेही जिंकतात. पण, काहीवेळा त्यांना ठिकठिकाणच्या प्रथा परंपरांचा फटकाही बसतो. अलीकडेच नाशिक शहराच्या हद्दीलगत असलेल्या गौळाणे येथे जाहीर झालेल्या कुस्तीच्या दंगलीसाठी आठ कुस्तीपटू महिला कार्यक्रमस्थळी आल्या; मात्र महिलांची कुस्ती लावण्याची व पाहण्याची प्रथा या गावात नसल्याचे कारण देत एकाही महिला कुस्तीपटूला खेळू दिले नाही. त्यामुळे या खेळाडूंना कुस्ती न करताच रिकाम्या हाताने परतावे लागले. महिला कुस्तीपटूंना बऱ्याचदा खेळ न करताच परतावे लागते. क्रिकेट, फुटबॉल आदी विविध खेळांप्रमाणे तांबड्या मातीतल्या या खेळावरही महिंला प्रेक्षकांची कृपादृष्टी व्हावी व महिला कुस्तीपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा महिला कुस्तीपटू व प्रशिक्षकांकडून केली जात आहे.