‘मुक्त’ला कुलगुरूंची प्रतीक्षा

By Admin | Updated: October 24, 2016 00:14 IST2016-10-24T00:13:29+5:302016-10-24T00:14:15+5:30

राजभवनाकडे लक्ष : प्रभारींच्या भरवशावर कारभार

Waiting for the Vice Chancellor | ‘मुक्त’ला कुलगुरूंची प्रतीक्षा

‘मुक्त’ला कुलगुरूंची प्रतीक्षा

नाशिक : नियुक्तीनंतर अवघ्या दोनच वर्षांत डॉ. माणिकराव साळुंखे यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुक्त विद्यापीठावर प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी राजभवनाकडून निवड समितीसाठी एका सदस्याच्या नावाची शिफारस करण्याचे विद्यापीठाला कळविले होते. त्यानुसार सप्टेंबरमध्ये विद्यापीठाने कार्यवाहीदेखील पूर्ण केली; मात्र अद्याप राजभवनाकडून कुलगुरू निवडप्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याने विद्यापीठाला नूतन कुलगुरू याचवर्षी लाभेल की त्यासाठी २०१७ उजाडेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनेकविध कारणांमुळे मुक्त विद्यापीठ नेहमीच चर्चेत राहिले आहे. मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम, त्यांची मान्यता, परीक्षेतील गोंधळ, गुणपत्रिकेतील त्रुटी, अभ्यासकेंद्रांचा कारभार आणि कर्मचारी भरती आदि कारणांमुळे येथील कुलगुरूंना सातत्याने टीकेला सामोरे जावे लागले आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनादेखील कर्मचारी भरती प्रकरणी टीका सहन करावी लागली. स्थानिक पातळीपासून ते राजभवनापर्यंत साळुंखे यांना राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला तोंड द्यावे लागले. या घडामोडी सुरू असतानाच त्यांनी गेल्या आॅक्टोबरमध्ये ‘वैयक्तिक’ कारणास्तव राजीमाना दिल्याने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद सध्या रिक्त आहे.
प्रभारी कुलगुरू म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. म्हैसेकर हे प्रभारी असल्यामुळे धोरणात्मक निर्णय ते घेऊन शकत नाहीत. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारीपददेखील प्रभारी असून, विविध आठ विद्याशाखांपैकी चार विद्याशाखांचा पदभार प्रभारीच आहे. नूतन कुलगुरूंची निवड होईपर्यंत येथील परिस्थिती कायम राहणार असून, अनेक निर्णय लांबणीवर पडून राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.