नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 7, 2016 00:51 IST2016-09-07T00:50:55+5:302016-09-07T00:51:05+5:30
पुढील आठवड्यात घोषणा : ठाणे, नवी मुंबईही शर्यतीत

नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ची प्रतीक्षा
नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत २७ शहरांची दुसरी यादी पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, नाशिकच्या सहभागाबाबतची उत्सुकता वाढली आहे. दुसऱ्या निवड फेरीत ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर ही शहरेही शर्यतीत असल्याने शिवाय, येत्या काही महिन्यांत गुजरातसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या प्रांतांच्या विधानसभा निवडणुका लागणार असल्याने यादीत स्थान मिळविण्यात नाशिकची कसोटी लागणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानात दुसऱ्या निवड फेरीत सहभागी होण्याची संधी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, महापालिकेने ३० जून रोजी प्रस्ताव सादर केला होता. क्रिसिल या नामवंत संस्थेच्या मदतीने महापालिकेने सुमारे २ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये सुमारे ३० ते ३५ प्रकल्प हे प्रायोजक तसेच उद्योग संस्थांच्या सीएसआर उपक्रमांतून प्रस्तावित करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी अभियानच्या पहिल्या यादीत नाशिकचा क्रमांक हुकला असला तरी नाशिक ५२.७५ टक्के गुणांकन प्राप्त करत ३४ व्या क्रमांकावर होते.