सातपूर टपाल कार्यालयाला प्रतीक्षा स्वमालकीच्या जागेची
By Admin | Updated: November 6, 2014 00:18 IST2014-11-06T00:03:33+5:302014-11-06T00:18:57+5:30
लहानशा घरात कारभार : जागा खाली करण्यासाठी मालकाचा तगादा; स्वत:ची जागा सोडून पुन्हा भाड्याच्याच जागेत जाण्याची तयारी

सातपूर टपाल कार्यालयाला प्रतीक्षा स्वमालकीच्या जागेची
सातपूर : सोळा वर्षांपासून अशोकनगरमधील एका लहानशा घरात भाडेतत्त्वावर टपाल खात्याचा कारभार सुरू आहे. हे घर खाली करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर पुन्हा आता नव्याने भाड्याचे घर शोधण्यासाठी टपाल खात्याला वणवण करावी लागणार आहे. टपाल कार्यालयासाठी सातपूर कॉलनीत खास राखीव भूखंडावरच प्रशस्त इमारत उभारणे अपेक्षित असताना, पुन्हा भाड्याच्याच घराचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रस्तावित टपाल कार्यालयासाठीच पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
औरंगाबाद गृहनिर्माण मंडळाने (म्हाडा) ४0 वर्षांपूर्वी सातपूरला अल्प, अत्यल्प, मध्यम, उत्पन्न गटासाठी गृह योजना उभारली. भविष्यात परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन सातपूर कॉलनीत टपाल कार्यालयासाठी म्हाडाने मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या आकाराचा भूखंड राखीव ठेवला आहे व रीतसर टपाल कार्यालयाच्या ताब्यात हा भूखंड देण्यात आला आहे. जवळपास तीस वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत या भूखंडावर टपाल खात्याची इमारत उभी राहिलेली नाही. दरम्यानच्या काळात तत्कालीन नगरसेवक अशोक गवळी यांनी नागरिकांच्या मदतीने पाठपुरावा केला होता. विद्यमान नगरसेवक सलीम शेख यांनीही अपर पोस्ट अधीक्षक व तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांना निवेदन देऊन राखीव भूखंडावर टपाल खात्याची इमारत उभारण्याची मागणी केली आहे. परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता सातपूर कॉलनीत टपाल कार्यालय उभारणे अपेक्षित ठरले आहे.
१९९८ साली अशोकनगर येथील राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या मालकीच्या एका लहान जागेत टपाल कार्यालय उभाण्यात आले आहे. हे घर अतिशय जुने झाले असून, पावसाळ्यात छत गळते. उन्हाळ्यात नागरिकांना उन्हात उभे राहावे लागते. या कार्यालयात दररोज ज्येष्ठ नागरिक आपल्या कामासाठी येतात. त्यांना हे कार्यालय अतिशय अडचणीचे ठरत आहे. कर्मचारीदेखील येथे काम करताना वैतागले आहेत. राखीव भूखंडावर टपाल कार्यालय उभारायचे नसेल तर भाडेतत्त्वावर मोठे प्रशस्त कार्यालय घ्यावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)