पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रतीक्षा
By Admin | Updated: July 24, 2016 22:37 IST2016-07-24T22:35:45+5:302016-07-24T22:37:39+5:30
पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रतीक्षा

पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी प्रतीक्षा
नांदगाव : कामायनी एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी नऊ वर्षे संघर्ष नांदगाव : शहराला जे काही मिळते ते झगडूनच घ्यावे लागते असा इतिहास आहे. मोबाईल, टूजी, थ्रीजी, पाणी, इंटरनेट सुविधा, एखाद्या एक्स्प्रेसचा थांबा हे व असे अनेक आधुनिक व शहराची जीवनरेखा आखणाऱ्या बाबी संघर्षातूनच मिळवाव्या लागल्या आहेत. विषय राज्याच्या अखत्यारितला असो की केंद्राच्या अधिकारातला, नांदगावकरांना आंदोलनाचा धक्का हा द्यावाच लागतो.
कामायनी एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी नऊ वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे कामायनी थांबायला लागली. कोणतीही नवीन गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आणि ती कमी अंतरात धावणारी असली तरी तिचा थांबा विनासायास येथे मिळत नाही. पुणे- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस हे अलीकडचे उदाहरण आहे.
मोठ्या शहरात राहून नोकरीच्या ठिकाणी दररोज ये-जा करायचे ही कामकाज संस्कृती आता रुजली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांसाठी सोयीच्या वेळांवर अधिक गाड्यांचे थांबे हा शहरातील कार्यालयांच्या कार्यक्षमतेचा निकष ठरत आहे. सायंकाळी नाशिककडे जाणारी गाडी व सकाळी नाशिक येथून येणाऱ्या गाडीच्या वेळेनुसार कार्यालयांचे कामकाज सुरू होते.
अनेकदा कार्यालये सुरू होण्याच्या नियोजित वेळेनंतर व सुटण्याच्या वेळेच्या आधीच रिकामी दिसतात. कारण रेल्वे गाडीच्या वेळा सोयीच्या नसतात. घरी जाण्याची घाई असते. त्यामुळे असे घडते. शहरातील सर्वच कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे हा अनुभव येत असतो.
मुख्यालयी राहण्याचा नियम केराच्या टोपलीत गेला आहे. मात्र मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता पगारबिलात मिळवून हजारो रुपयांचा मलिदा नोकरशाहीच्या खिशात जात आहे. त्याचा विपरीत परिणाम शहराच्या विकास व्यवस्थेवर होत आहे. हा संशोधनाचा भाग आहे.
अपडाऊन (ये-जा) हा नोकरी व्यवस्थेचा अविभाज्य भाग मानला, तर युवा फाउंडेशन या तरुणांच्या सामाजिक संस्थेने पुणे-भुसावळ एक्स्प्रेसच्या नांदगाव थांब्याची केलेली मागणी समर्थनीय ठरते. सोशल मीडियामधून ही मागणी व्हायरल झाली आहे. (वार्ताहर)