पालकांना गतिरोधकाची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 21, 2016 22:33 IST2016-01-21T22:32:47+5:302016-01-21T22:33:28+5:30
नेहरूनगर : पालकच बजावताहेत वाहतूक पोलिसाची भूमिका

पालकांना गतिरोधकाची प्रतीक्षा
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेविअर्स शाळेसमोरील चौकात पालकच वाहतूक पोलिसाची भूमिका बजावत आहेत. झेविअर्सबरोबर केंद्रीय विद्यालयाचीदेखील शाळा असल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या चौकात गतिरोधक बसवावे, अशी कित्येक दिवसांपासून पालकांची मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावर ही शाळा असून, शाळा परिसरात वेगाने येणारे दुचाकीचालक व ट्रकचालक यांच्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. याबद्दलचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस नाशिकरोड अध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी दिले होते. मात्र येथे कुठल्याही प्रकारचे गतिरोधक, फलक व वाहतूक पोलीस कर्मचारी कशाचीही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. सकाळी शाळा भरण्याची वेळ व करन्सी नोट प्रेसची वेळ सारखीच असल्याकारणाने येथे विद्यार्थ्यांचे वारंवार किरकोळ अपघात होत असतात. पालक येथे वाहतूक नियंत्रण करीत असल्याने वाहनधारक व पालक यांच्यात रोज बाचाबाची व भांडणे होत असतात. त्यामुळे येथे एक वाहतूक पोलीस कर्मचारी शाळा भरते वेळी व सुटण्याच्या वेळी नेमण्याची गरज आहे. शाळेजवळ ‘वेगमर्यादा’ व ‘पुढे शाळा आहे’ असे फलक असले पाहिजेत पण येथे असे कोणतेही फलक नाही. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा हे निवेदन देण्यात आले आहे. तत्काळ गतिरोधक तसेच वाहतूक पोलीसाची नियुक्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी मुकेश शेवाळे, अमोल लोखंडे, सुहास हांडोरे, प्रमोद खोलमकर, अमोल धावणे, किरण पगारे, ऋषिकेश कोठुळे, प्रशांत खैरनार, निखिल खैरनार, संदेश बच्छाव, इम्रान अन्सारी, शुभम चांदण, प्रसाद डोंगरे, स्वप्नील सोनवणे, सचिन जगताप, कन्हैया पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)