एलबीटी अनुदानाबाबत प्रतीक्षा

By Admin | Updated: April 14, 2016 00:32 IST2016-04-14T00:17:35+5:302016-04-14T00:32:00+5:30

महापालिका : प्रतिमाह ४० कोटींची शक्यता

Waiting for LBT subsidy | एलबीटी अनुदानाबाबत प्रतीक्षा

एलबीटी अनुदानाबाबत प्रतीक्षा

नाशिक : महापालिकेला चालू आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून एलबीटीपोटी किती अनुदान मिळणार याबाबत प्रतीक्षा लागून असून प्रतिमाह सुमारे ४० कोटी रुपये अनुदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात महापालिकेने शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांहून अधिक महसूल प्राप्त केल्याने सुमारे ७० ते ७५ कोटी रुपये शासनाला परत द्यावे लागल्यास महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे.
राज्य शासनाने दि. १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटींच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्या मोबदल्यात महापालिकेला अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, ५० कोटींच्या वरील उलाढालीवरील एलबीटी सुरू ठेवण्यात आला. महापालिकेला मागील वर्षी ७५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. महापालिकेने मार्च अखेर एलबीटीच्या माध्यमातून ८२६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. तर महापालिकेला २३४.३७ कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त झाले. मुद्रांक शुल्काच्या एक टक्का अधिभारापोटीही ५४ कोटी रुपये शासनाकडून मिळाले. मागील वर्षी महापालिकेने ५३६ कोटी ७० लाखांचा निव्वळ एलबीटी वसूल केला होता. आयुक्तांनी सुधारित उद्दिष्ट ८१० कोटी रुपयांचे निश्चित केले होते. महापालिकेने मात्र सुधारित उद्दिष्ट ओलांडत त्यापेक्षा अधिक १५ कोटी रुपयांची भर उत्पन्नात घातली होती. महापालिकेने उद्दिष्ट ओलांडल्याने महापालिकेला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात अनुदान मिळाले नव्हते उलट महापालिकेला सुमारे ७० कोटी रुपये शासनाला परत करावे लागण्याची शक्यता आहे. आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एलबीटी अनुदानाबाबत शासनाकडून अद्याप कसलीही निश्चिती नसल्याने मनपा प्रशासन संभ्रमात आहे. एप्रिलचा पंधरवडा उलटून गेला तरी अजून शासनाकडे तसे निर्देशही नाहीत. त्यामुळे अनुदानाची प्रतीक्षा लागून आहे.

Web Title: Waiting for LBT subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.