नाशिकमध्येही महापालिकेकडून सदर योजना राबविण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 1, 2015 01:54 IST2015-04-01T01:52:25+5:302015-04-01T01:54:27+5:30
नाशिकमध्येही महापालिकेकडून सदर योजना राबविण्याची प्रतीक्षा

नाशिकमध्येही महापालिकेकडून सदर योजना राबविण्याची प्रतीक्षा
नाशिक : सांगली महानगरपालिकेने एलबीटी वसुलीबाबत व्यापारी-व्यावसायिकांसाठी सवलत योजना ३० मार्चपासून लागू केल्यानंतर आता नाशिकमध्येही महापालिकेकडून सदर योजना राबविण्याची प्रतीक्षा व्यापाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत शब्द दिला असल्याने लवकरच नाशकात सदर योजना लागू होण्याची शक्यता व्यापारी महासंघाचे प्रफुल्ल संचेती यांनी व्यक्त केली आहे.एलबीटीची थकबाकी न भरणे आणि विवरणपत्र मुदतीत सादर न करणे, याबद्दल नाशिक महापालिकेने व्यापारी-व्यावसायिकांविरुद्ध नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत कारवाईची मोहीमच राबविली होती. या मोहिमेत महापालिकेने सुमारे साडेसात हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या, तर हजाराहून अधिक व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याची कारवाई केली होती. याशिवाय मुदतीत विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येत होती. मात्र, व्यापारी महासंघाने या कारवाईविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना तोंडी आदेश देत कारवाई थांबविण्याची सूचना केल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार जानेवारीपासून कारवाई ठप्प झालेली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली; परंतु व्यापाऱ्यांनी १ एप्रिलपासूनच घोषणेची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरत पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याची तयारी चालविली होती. त्यामुळे १ एप्रिलपासून व्यापारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून होते. (प्रतिनिधी)