मालेगावातील रस्त्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा!

By Admin | Updated: November 25, 2015 21:58 IST2015-11-25T21:57:34+5:302015-11-25T21:58:27+5:30

शोकांतिका : वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ; रस्त्यांचे भाग्य मात्र उ जळलेच नाही

Waiting for good days in Malegaon roads! | मालेगावातील रस्त्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा!

मालेगावातील रस्त्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा!

प्रवीण साळुंके मालेगाव
शहरात आजमितीस दोन ते तीन लाख वाहने असून, मागील पाच वर्षात हजारोंच्या संख्येने नवीन वाहने वाढली आहेत. शहरातील वाहनांची संख्या सांगणे कठीण असले, तरी रस्ते मात्र ‘जैसे थे’ आहेत. येथे महानगरपालिका अस्तित्वात येऊन ११ वर्षे झाली तरी शहरातील मुख्य रस्ते वाढलेले नाहीत. त्यामुळे शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी, पार्किंग, अपघात आदि समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
कोणत्याही शहर किंवा महानगरपालिकेच्या परिस्थितीचे अवलोकन शहरातील रस्त्यांवरून होते. शहरात आजमितीस एकही रस्ता खड्डेमुक्त नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त असताना, रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शहरात गेल्या पाच वर्षात एक लाखापेक्षा जास्त, तर तालुक्यात चाळीस ते पन्नास हजारांच्या आसपास वाहनांची संख्या वाढली आहे. यात नवीन वाहनांबरोबरच जुन्या वाहनांचा समावेश आहे. दरवर्षी रस्त्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन कोट्यवधी रुपयांचा निधी देते. तो कुठे जातो, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यात मनपाच्या निधी वेगळा आहे.
२००१ साली शहरातील नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. नागरिकांना रस्ते, स्वच्छता, रोज पाणी आदि सुविधा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली. मात्र काही वर्षातच नागरिकांचा भ्रमनिरास झाला. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदीनुसार गेल्या पाच वर्षात शहरात चाळीस हजारांच्या आसपास दुचाकी, तीन हजार चारचाकी, एक ते दोन हजार तीन चाकी, चारचाकी प्रवासी वाहने, मालवाहू वाहने वाढली आहेत. महिन्याला सरासरी हजार नवीन वाहनांची भर पडत आहे. मात्र त्यामानाने रस्ते आहेत तसेच आहेत खड्डेमय.
शहराच्या विकासात रस्ते महत्त्वपूर्ण असतात. रस्त्याच्या स्थितीवरून शहराची ओळख होत असते. सुमारे १३ चौरस किमी हद्द असलेल्या मालेगाव शहरात मुख्य रस्त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. या रस्त्यांची स्थिती सुधारण्याचे नाव नाही. यात गिरणापूल ते मोसमपूल, सटाणा नाका ते मोसमपूल, मोसमपूल ते कॅम्प, एकात्मता चौक ते रावळगाव नाका तेथून नामपूर, द्याने ते नवा बसस्थानक व दरेगाव ते बसस्थानक हे प्रमुख मार्ग आहेत. यातील एकही रस्ता चांगला नाही. यातील काही रस्त्यांचे मनपातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून रुंदीकरणाचे काम सुरू आहे, तर काही रस्त्यांचे केलेले काम अनेकवेळा करूनही ‘जैसे थे’ आहे.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिक्षेत्रात मार्च २०१० अखेर एक लाख ७० हजार ८२६ वाहने होती. त्यात मार्च ११ मध्ये २९ हजार ३३८, २०११-१२ वर्षात २९ हजार ३६५, २०१२-१३ साली २६ हजार ६८९, २०१३-१४ साली ३६ हजार ८११ वाहनांची भर पडल्याने परिक्षेत्रात नोंदणीकृत वाहनांची संख्या मार्च २०१४ अखेर दोन लाख ८५ हजार १४१ झाली आहे. यात येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील म्हणजे एमएच १५ नोंदणीची, तर राज्यासह इतर राज्यातून आलेल्या वाहनांची संख्या मिळून शहरात दोन ते अडीच लाखांपेक्षा जास्त वाहने असल्याचे बोलले जाते. यात तालुक्यातील प्रवासी व मालवाहू वाहनांची भर पडते.
तसेच कामानिमित्त येणाऱ्या वाहनांची संख्या वेगळी आहे. त्यामानाने येथील मुख्य रस्त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही वाढली नाही. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील नोंदीनुसार २०१० पासून रस्ते कामावर सुमारे चार ते पाच कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे नमूद आहे. यात २०१३-१४ साली महापालिकेच्या सुधारित अंदाजपत्रकात ८० लाख रुपयांची रस्ते दुरुस्ती, पट्टे आदिंसाठी तरतूद करण्यात आली होती.
शहरातील गिरणापूल ते मोसमपूलमार्गे बसस्थानक - दरेगाव या रस्त्यापैकी महापालिका हद्दीतील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सुरू आहे. यासाठी आजपावेतो सुमारे १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आले असल्याची माहिती आहे. तरी हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. या रस्त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेही झाली. अनेकांनी अपघातात जीवही गमावले आहेत. तरीही अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही.
शहरातील दुसरा रस्ता म्हणजे सटाणानाका ते मोसमपूल. या रस्त्यावर आजपावेतो कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले
आहेत. सात ते आठ वर्षांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्याचे लोढा भुवन ते सटाणा नाक्यापर्यंत एका बाजूचे काम अर्धवट करण्यात आल्यानंतर ते सोडून देण्यात आले.
या रस्त्याचे काम अपूर्ण असताना दोन ते तीन वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. जेसीबी लावून या बाजूकडील सपाटीकरण करून माती काढून एक ते दीड फुटाची चारी खोदण्यात आली. त्यानंतर हे काम अचानक बंद झाले. खोदलेल्या चारीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या चारीत वाहनधारकांसह अनेकजण पडल्याने येथील व्यावसायिकांनी ही चारी बुजवून टाकली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर दुुरुस्तीसाठी नव्वद लाख रुपये खर्च करण्यात आले आणि नंतर महिनाभरातच रस्त्याला खड्डे पडले.
शहरातील चौकांची स्थिती दयनीय असून, वाहनधारकांना
खड्डे चुकविण्याकडे लक्ष देण्यात जास्त वेळ खर्ची घालावा लागतो. यावरून येथील परिस्थितीची कल्पना येते.

Web Title: Waiting for good days in Malegaon roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.