बोगदा खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा
By Admin | Updated: January 12, 2016 23:11 IST2016-01-12T23:07:47+5:302016-01-12T23:11:28+5:30
अपेक्षा : प्रजासत्ताक दिनी व्हावा निर्णय

बोगदा खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा
इंदिरानगर : गोविंदनगरकडे जाणारा बोगदा बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असताना प्रजासत्ताक दिनी तरी बोगद्यातून जाण्या-येण्याचे स्वातंत्र्य मिळेल का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनधारक ांनी उपस्थित केला आहे.
इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणारा बोगदा सुमारे सात महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अचानक बंद करण्यात आला. यासंबधी पोलीस प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नसताना ही कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह सामाजिक संस्था, राजकीय नेते मंडळींकडून कार्यवाहीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बोगद्याच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये असलेल्या तीव्र भावना लक्षात घेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आंदोलनही केले. मात्र पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत सामाजिक व राजकीय संघटनांनी केलेली आंदोलनांची कोणतीही दखल घेतली गेली नाही.
इंदिरानगर परिसरातील हजारोंच्या संख्येने असलेल्या वाहनधारकांना पोलीस प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत आहे. वाहनधारकांना सुमारे तीन कि.मी. अंतराचे वळण घेऊन लेखानगर समोरील बोगद्यातून ये-जा करावी लागत आहे, तर जॉगिंग ट्रॅकच्या समांतर रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे, परंतु समोरून येणाऱ्या वाहनधारकांचा हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असल्याचा समज होतो. त्यामुळे त्यांच्याकडून दुहेरी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून, परिसरात अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
इंदिरानगरक डून गोविंदनगरकडे जाण्यासाठी बोगदा सुरू करावा, अशी मागणी होत असून त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय कमी होणार आहे. बोगदा बंद असल्याने इंदिरानगरवासीयांची मोठी अडचण होत असल्याने प्रजासत्ताक दिनी तरी बोगदा सुरू करून परिसरातील नागरिकांना आनंदाची बातमी द्यावी, अशी मागणी होत आहे.