वाघमारे अखेर सक्तीच्या रजेवर अध्यक्षांचे आदेश : उद्धट वर्तणूक, बेजबाबदारपणा भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:23 IST2018-03-10T01:23:05+5:302018-03-10T01:23:05+5:30

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी उर्मट वागण्यावरून अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी अर्थसंकल्पीय सभेतही उद्धटपणे उत्तरे दिल्याप्रकरणी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश शीतल सांगळे यांनी दिले.

Waghmare finally ordered the compulsory leave: Curious behavior, irresponsibility | वाघमारे अखेर सक्तीच्या रजेवर अध्यक्षांचे आदेश : उद्धट वर्तणूक, बेजबाबदारपणा भोवला

वाघमारे अखेर सक्तीच्या रजेवर अध्यक्षांचे आदेश : उद्धट वर्तणूक, बेजबाबदारपणा भोवला

ठळक मुद्देदालनातून हाकलून देत माहिती देण्यास नकार दिलासदस्यांनी देखील संयमाने वागण्याचा सल्ला दिला होता

नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी उर्मट वागण्यावरून वादग्रस्त ठरलेले लघु पाटबंधारे पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेतही उद्धटपणे उत्तरे दिल्याप्रकरणी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. वाघमारे यांच्या वर्तणुकीविषयी संबंध सभागृहाने तक्रारी करीत त्यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी करीत सभागृहाचे कामकाज रोखून धरले होते. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी काही महिन्यांपूर्वी यशवंत शिरसाठ या सदस्यांना आपल्या दालनातून हाकलून देत माहिती देण्यास नकार दिला होता. संबंधित सदस्याने जलयुक्त शिवाय योजनेची माहिती संदर्भात संबंधित अभियंत्याला विचारणा केली असता महाशयांचा पारा चढला होता. त्यांनी संबंधित सदस्यांना माहिती दिली नाहीच शिवाय आपणाला ओळख नसल्याचेही विधान केले होते. याप्रकरणी त्यांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नोटीस बजविली होती. तसेच अध्यक्ष तसेच अन्य सदस्यांनी देखील संयमाने वागण्याचा सल्ला दिला होता. तरीही त्यांच्यात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याच्या तक्रारी वारंवार सदस्यांकडून करण्यात येत होत्या. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत संजय बनकर यांनी सुरगाणा तालुक्यातील खोकरी पाझर तलावाचे अंदाजपत्रक १ कोटी ७ लाखांवरून १ लाख ५८ हजारांवर कसे गेले याची विचारणा केली असता त्यांनी आपणाला काहीच माहित नसल्याचे उत्तर दिलेच शिवाय तसे असेल तर माहिती घेतो असेही उत्त्तरादाखल त्यांनी सांगितले. यावर बनकर यांनी सदर प्रश्न सभेत आपणाला विचारला जाणार आहे याची आपणाला कल्पना होती का असे विचारले असता त्यांनी आपणाला कल्पना नव्हती असे सांगितल्याने बनकर यांनी या उत्तरावर तीव्र आक्षेप घेत विषयपत्रिकेवर आपली स्वाक्षरी असतांनाही आपण बेजबाबदारपणाचे उत्तरे सदस्यांना का देत आहेत असे सुनावत वाघमारे यांचे वर्तन उर्मट असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. बनकर यांच्याबरोबरच कुंभार्डे, शिरसाठ, क्षिरसागर तसेच नीलेश केदार आदि सदस्यांनी देखील वाघमारे अतिशय बेजबाबदारपणे बोलत असल्याचे सांगून जिल्हा परिषद सदस्यांना सन्मान देत नसल्याचे अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी केली.
वाघमारे यांना सदस्यांचे प्रश्न आणि त्यांचे काम आठवत नाही मात्र ठेकेदारांचे सर्वकाही कसे आठवते असा सवाल नीलेश केदार यांनी करीत वाघमारे यांच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी सभागृहाला केली. यावेळी अध्यक्ष शीतल सांगळे यांनी देखील वाघमारे यांना चांगलेच खडासावले. वारंवार संधी देऊनही आपल्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनीही वाघमारे यांच्याकडून चांगल्या कामाची आणि जबाबदारीची अपेक्षा असल्याचे नमुद करीत त्यांचे वर्तन आक्षेपाहर्य असल्याचे सांगून नियमानुसार कारवाई केली जाईल असे सांगितले. यावेळी अध्यक्ष सांगळे यांनी वाघमारे यांच्यात कोणत्याही प्रकारच्या सुधारण्याची शक्यता नसल्याने आणि कामाबाबत ते गंभीर नसल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
प्रशासकीय पेच कायम
शासकीय परिपत्रकात मात्र कार्यमुक्त किंवाा सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबतची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांना करता येणार नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कित्येकदा संबंधितांना कार्यमुक्त केले जाते आणि नंतर पदस्थापनेची मागणी केली जाते. ही चुकीची प्रथा असून आगोदर संबंधितांच्या जागेवर नवीन नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करता येईल असे पत्रक असल्याने वाघमारे यांच्याविषयी आता शासनाकडे अभिप्राय मागितला जाणार असल्याचे समजते.

Web Title: Waghmare finally ordered the compulsory leave: Curious behavior, irresponsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.