वाड्याला झळाळी
By Admin | Updated: April 12, 2016 00:29 IST2016-04-11T23:15:41+5:302016-04-12T00:29:20+5:30
देवपूर : पुरातन वास्तू जनत करण्याचा प्रयत्न

वाड्याला झळाळी
शैलेश कर्पे सिन्नर
सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील ऐतिहासिक राणेखान वाड्यात एमआयडीसी पोलीस ठाणे, देवपूर ग्रामपंचायत, शंभूराजे गु्रप व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. तीन दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे राणेखान वाड्याला झळाळी प्राप्त झाली आहे. पुरातन व ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.
महादजी शिंदे यांचे निष्ठावान सेवक राणेखानच्या वास्तव्यामुळे देवपूर गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. देवनदीच्या तीरावर आजही राणेखान वाडा दिमाखात उभा आहे. वाड्याची पडझड झाली असली तरी तो जतन करण्याचे प्रयत्न या मोहिमेतून करण्यात येत असल्याचे दिसते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी पुढाकार घेऊन सदर वास्तू जतन करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले होते. सरपंच मदन गोळेसर, शंभूराजे गु्रपचे तुषार गडाख, डॉ. दीपक गडाख, अविनाश गडाख यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ७ वाजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सपकाळे व त्यांचे कर्मचारी राणेखानच्या वाड्यात हजर झाले.
सुरुवातीला राणेखान यांच्या मुख्य कबरीचा मकबरा साफ करून मौलवींच्या हस्ते पूजन करून चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. शंभूराजे ग्रुपच्या वतीने जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला होता. वाड्यात अस्ताव्यस्त पडलेले दगड जमा करण्यात आले.
उपसरपंच बाळासाहेब कळींबे, ग्रामपंचायत सदस्य संजय गडाख, रघुनाथ गोळेसर, विकास गडाख, म्हाळू खोले, भालचंद्र घरटे, नानासाहेब खुळे, अनिल गडाख, सचिन गडाख, अनिल गडाख, विलास गवळी, शरद गडाख, अनिल कर्डिले, दीपक गडाख, संदीप गडाख, प्रशांत गवळी, दिनेश गडाख, अनिवाश पाटील, संजय गायकवाड, सतीश गायकवाड, इलियास खतिब, दीपक गायकवाड, भय्या गडाख, भय्या जहागीरदार, विलास इघे, सोपान गडाख, रवींद्र गडाख, अमोल गडाख, भाऊसाहेब गडाख यांच्यासह ग्रामस्थ या मोहिमेत सहभागी झाले होते.