वडाळा-अशोका मार्ग परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

By Admin | Updated: May 10, 2014 23:54 IST2014-05-10T22:07:59+5:302014-05-10T23:54:27+5:30

दिलासा : दोन्ही जलकुंभांच्या तपासणीला प्रारंभ

Wadala-Ashoka Marg will get water dispute | वडाळा-अशोका मार्ग परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

वडाळा-अशोका मार्ग परिसराचा पाणीप्रश्न सुटणार

दिलासा : दोन्ही जलकुंभांच्या तपासणीला प्रारंभ
वडाळागाव : गेल्या अनेक वर्षांपासून वडाळागाव व अशोका मार्ग परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. कधी कमी दाबाने तर कधी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार या भागांमधून केली जात होती. त्यामुळे या परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रभाग ३८ मध्ये दोन नवीन जलकुंभ बांधण्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात या जलकुंभांवरून पाणीपुरवठा केला जाणार असल्याची शक्यता आहे.
वडाळागावातील महारुद्र हनुमान मंदिराच्या मागील बाजूस व पखालरोड येथे प्रत्येकी दोन जलकुंभ महापालिकेने नव्याने उभारले आहेत. या दोन्ही जलकुंभांची क्षमता वीस दशलक्ष लीटर असून, या जलकुं भांचे काम पूर्णत्वास आले आहे. दररोज एक-दोन लीटर पाणी भरून जलकुंभांची तपासणी केली जात असल्याचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते पखालरोड जलकुंभ व वडाळागाव जलकुंभापर्यंत वीस इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. तसेच या जलवाहिन्यांद्वारे सद्यस्थितीत प्रभागातील कमी व्यासाच्या जलवाहिन्या जोडणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
इन्फो........
या परिसराला होणार लाभ
संपूर्ण वडाळागाव परिसर, वडाळरोडवरील चिश्तिया कॉलनी, जयदीपनगर, मिल्लतनगर, अशोका मार्ग, पखालरोड, खोडेनगर, विधातेनगर, कल्पतरूनगर, हॅप्पी होम कॉलनी, नारायणनगर, गणेशबाबानगर, रविशंकर मार्ग, कुर्डूकरनगर, स्टेट बॅँक कॉलनी, डीजीपीनगर अशा प्रभाग ३८ मधील सर्वच उपनगरीय वसाहतींना नवीन जलकुंभांचा लाभ होणार आहे.
 .
वडाळावासीयांचा संघर्ष संपुष्टात
वडाळागावाला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. राजीवनगर च‹ा पार्क जलशुद्धीकरण केंद्राचा वडाळागाव हा अखेरचा टप्पा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे रहिवाशांना नेहमीच पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. परिणामी वडाळागावात नेहमीच कमी दाबाचा पाणीपुरवठा ही नित्याची बाब झाली होती; मात्र नवीन जलकुंभामुळे पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष संपुष्टात येणार आहे.
 
पाणीपुरवठ्याची समस्या हद्दपार
माझा प्रभाग हा जुन्या चार वार्डांचा मिळून तयार झाला आहे. अशोका मार्ग परिसर हा झपाट्याने विकसित होत असून, लोकसंख्यादेखील वाढत असून, पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवू नये, यासाठी महापालिके कडे पाठपुरावा करून अशोका मार्ग व वडाळ्यात जलकुंभ बांधले. यामुळे प्रभागात पाणीपुरवठ्याची कोणतीही समस्या राहणार नाही.
- सतीश कुलकर्णी, उपमहापौर

Web Title: Wadala-Ashoka Marg will get water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.