‘प. सा. नाट्ययज्ञ’
By Admin | Updated: March 15, 2015 01:08 IST2015-03-15T01:05:33+5:302015-03-15T01:08:31+5:30
‘प. सा. नाट्ययज्ञ’

‘प. सा. नाट्ययज्ञ’
नाशिक : सार्वजनिक वाचनालय लवकरच १७५व्या वर्षात पदार्पण करीत असून, यानिमित्त पुढील महिन्यापासून ‘प. सा. नाट्ययज्ञ’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरातील विविध नाट्यसंस्था सावानाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात वर्षभरात दर महिन्याला एक अशी बारा नाटके सादर करणार असून, यानिमित्ताने नाशिककरांना नवी नाटके पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
येत्या २६ एप्रिलपासून या उपक्रमाचा प्रारंभ अश्वमेध थिएटर्सच्या नाटकाद्वारे होणार आहे. या उपक्रमात परशुराम साईखेडकर नाट्यगृहात दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी शहरातील नाट्यसंस्था नवीन नाटक सादर करणार आहे. फक्त नोंदणीकृत संस्थाच या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. नाटकाचा पहिला प्रयोग करणाऱ्या संस्थांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यानंतर दुसरा व तिसरा प्रयोग असलेल्या नाटकाचा विचार केला जाणार आहे. त्यापेक्षा अधिक प्रयोग झालेल्या नाटकांना या उपक्रमात संधी दिली जाणार नाही.
या नाट्यसंस्थांना नाट्यगृहाबरोबरच प्रकाशयोजना, लेव्हल्स आदि साहित्यही पुरवले जाणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक नाटकाच्या प्रयोगानंतर कलावंत व प्रेक्षकांचे चर्चासत्र होणार असून, त्यात प्रेक्षक कलावंतांना प्रश्न विचारू शकणार आहेत. यासाठी संबंधित संस्थेला नाममात्र शुल्क सावानात भरावे लागणार आहे. या उपक्रमात अश्वमेध थिएटर्स (२६ एप्रिल), बाबाज् थिएटर्स (१६ मे), दीपक मंडळ (२० जून), ऋतुरंग (१८ जुलै) या चार संस्थांचे प्रयोग निश्चित झाले असून, लोकहितवादी मंडळ, द जीनिअस, आर. एम. ग्रुप, स्पंदन, बालभवन (सावाना), मेनली अमॅच्युअर या संस्थाही उपक्रमात सहभागी होणार आहेत. सार्वजनिक वाचनालयाचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपाध्यक्ष नरेश महाजन, कार्यवाह मिलिंद जहागीरदार उपस्थित होते.