पाच वर्षांपासून खोरीपाडा करतोय गिधाड संवर्धन
By Admin | Updated: September 2, 2016 23:18 IST2016-09-02T23:17:58+5:302016-09-02T23:18:41+5:30
प्रजाती जतन : वनविभाग, आदिवासींच्या प्रयत्नाने राज्यातील एकमेव प्रकल्पाला यश

पाच वर्षांपासून खोरीपाडा करतोय गिधाड संवर्धन
अझहर शेख नाशिक
जगाच्या पाठीवर दुर्मिळ होत चाललेल्या गिधाड पक्ष्याचे संवर्धन नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील खोरीपाड्यात वनविभाग व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने यशस्वी होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पांढरी पाठ व लांब चोच असलेल्या दोन गिधाडांच्या प्रजाती जतन करण्यामध्ये आदिवासी बांधवांना निसर्गाची साथ लाभली आहे. अडीचशेहून अधिक गिधाडांची नोंद येथील ‘रेस्तरां’वर करण्यात आली आहे. ‘गिधाड रेस्तरां’मुळे खोरीपाड्याची अवघ्या महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण झाली आहे.
आजच्या आधुनिक युगात भारतासह अमेरिका, दक्षिण आशिया व अन्य प्रदेशातील गिधाडांच्या विविध प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे निसर्गातील प्रदूषण रोखण्याचे अभूतपूर्व पर्यावरण संरक्षणाचे कार्य करणारी गिधाडे नामशेष होत असल्याने जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहे. जैवविविधतेमधील अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी गिधाडांच्या प्रजातींचे अस्तित्व तेवढेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्याच्या त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या खोरीपाड्यात ग्रामस्थ व हरसूल वनविभागाने गिधाड संवर्धनाचा उपक्रम मागील पाच वर्षांपासून हाती घेतला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प चांगलाच यशस्वी झाला असून, यावर्षी जून महिन्यात दोन्ही प्रजातींच्या मिळून २५० गिधाडांची नोंद रेस्तरांवर करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. पंचक्रोशीत मृत झालेल्या प्राण्यांची माहिती ग्रामस्थ वनविभागाला देतात. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वाहनामध्ये सदर प्राणी आणून त्याची वैद्यकीय तपासणी करतात. डायक्लोफिनॅक या वेदनाशामक औषधी द्रव्यांचे अंश प्राण्यांमध्ये नसल्याची खात्री पटल्यानंतरच सदर प्राण्याचे खाद्य गिधाड रेस्तरांवर उपलब्ध करून दिले जाते. २०११ साली वनविभाग नाशिकच्या वतीने तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून खोरीपाडा येथे ‘गिधाडांचे उपाहारगृह’ हा प्रकल्प लोकसहभागातून साकारण्यात आला. तत्कालीन पश्चिम वनविभागाच्या वनसंरक्षक अनिता पाटील, हरसूल परिक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे यांनी यासाठी प्रयत्न करून खोरीपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.