जिल्हा मध्यवर्ती बॅँकेसाठी १९ मे रोजी मतदान आजपासून अर्ज दाखल होणार
By Admin | Updated: April 20, 2015 01:45 IST2015-04-20T01:44:41+5:302015-04-20T01:45:10+5:30
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेसाठी १९ मे रोजी मतदान आजपासून अर्ज दाखल होणार

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेसाठी १९ मे रोजी मतदान आजपासून अर्ज दाखल होणार
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १९ मे रोजी मतदान होणार आहे. सोमवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. बॅँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या २०१५-२०२० या वर्षाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सहकार खात्याने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या १९ मे रोजी मतमोजणी होऊन २१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था आणि धान्य अधिकोष सहकारी संस्था यांचे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १५ प्रतिनिधी, महिला राखीव-२, अनुसूचित जाती जमाती-१, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग-१, इतर मागास प्रवर्ग-१ आणि इतर बिगर आदिवासी संस्थेतील-१ या गटातील २१ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. सोमवारी (दि.२०) सकाळी ११ ते ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत २४ पर्यंत आहे. दि. २७ रोजी दाखल अर्जांची छाननी होणार आहे. दि. २८ रोजी वैध अर्जांची नावे जाहीर केली जातील, तर २८ एप्रिल ते ११ मे या कालावधीत ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत माघारीसाठीची मुदत देण्यात आलेली आहे. दि. १२ मे रोजी अंतिम यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दि. १९ मे रोजी मतदान आणि दि. २१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.