मतदान, मतमोजणी एकाच दिवशी ग्रामपंचायत निवडणूक
By Admin | Updated: December 2, 2014 00:42 IST2014-12-02T00:41:25+5:302014-12-02T00:42:02+5:30
: गावातच विजयी मिरवणूक

मतदान, मतमोजणी एकाच दिवशी ग्रामपंचायत निवडणूक
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान गावातच घेऊन नंतर तालुक्याच्या मुख्यालयी त्याची दुसऱ्या दिवशी मोजणी करून उमेदवारांना प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीत राज्य निवडणूक आयोगाने आता बदल केले असून, २३ डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मतदान झाल्यानंतर अर्ध्यातासाने त्याच गावात घेऊन निकाल घोेषित करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयोगाच्या निर्णयामुळे आता मतदान कर्मचाऱ्यांनाच मतमोजणीचे काम करावे लागणार आहे. राज्यात जानेवारी ते एप्रिल दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम राज्य आयोगाने जाहीर केला असून, त्यानुसार सोेमवारी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुरुवार दि. ४ डिसेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होईल व ८ रोजी संपुष्टात येईल, तर ११ डिसेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदान आटोपल्यानंतर सहा वाजता ज्या ग्रामपंचायतीचे मतदान झाले असेल त्या ग्रामपंचायतीच्याच मध्यवर्ती ठिकाणी सर्व यंत्रे एकत्र आणून पुरेशा पोलीस बंदोबस्तात मतमोजणी करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने या ठिकाणी उपस्थित राहणे व मतदान केंद्राध्यक्षाने मतमोजणीचे पर्यवेक्षण करावे, तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर जागीच विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात येणार आहे